भंडारा (वृत्तसंस्था) रागाच्या भरात घरून निघून आलेली अल्पवयीन मुलगी भंडारा बस्थानकावर बसून होती. ती एकटी असल्याचे बघून तिला फूस लावून मित्राच्या रूमवर नेत तिच्यावर तीन दिवस सामूहिक अत्याचार करण्यात आला. ही धक्कादायक घटना भंडारा शहर परिसरात घडली. या अल्पवयीन पीडितेने भंडारा पोलीस ठाण्यात १५ दिवसांनंतर तक्रार केली. याप्रकरणी भादंविच्या कलम ३७६ आणि पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
आईवडील काम करण्याकरिता बाहेर जाऊ देत नाहीत. तसेच डान्स क्लास लावण्यास नकार देत असल्याचा राग मनात धरून पीडित अल्पवयीन मुलगी आईवडील बाहेरगावी गेले असताना घराबाहेर पडली. २७ जून रोजी ती घरून एकटीच निघून भंडारा बसस्थानकावर आली. बसस्थानकावर एकटी बसून असताना दोन तरुण तिच्याजवळ येऊन विचारपूस करू लागले. हळूहळू त्यांनी तिच्याशी गप्पा मारण्यास सुरुवात केली आणि नंतर तिला कोरंभी येथे फिरायला घेऊन गेले. फिरून आल्यावर दोन आरोपींनी पीडितेला तिसऱ्या मित्राच्या घरी नेले आणि तेथे दोन मित्रांना बोलावून घेतले.
रात्री उशीर झाल्याने पिडीतेने आरोपींना तिला बसस्थानकावर परत सोडून देण्यासाठी आग्रह केला. मात्र, त्याचवेळी आरोपींनी तिच्याकडे शारीरिक संबंधांची मागणी केली. पीडितेने नकार दिल्यानंतरही त्यांनी बळजबरीने तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. दुसऱ्या दिवशी २८ जून रोजी सकाळी सात वाजता दोन आरोपींनी तिला बसस्थानकावर सोडून दिले. मात्र, १० वाजता पुन्हा दोन आरोपी पीडितेकडे आले आणि तिला जेवण देतो, असे सांगून मित्राच्या रूमवर घेऊन गेले. जेवण झाल्यावर दोघांनी पुन्हा तिच्यावर अत्याचार केला.
सायंकाळी त्यांनी पीडितेला बसस्थानकावर सोडून दिले. मात्र, रात्री उशीर झाल्यामुळे ती जिल्हा रुग्णालयात थांबून राहिली. दरम्यान, पिडीता बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या कुटुंबीयांनी अड्याळ पोलिसात दाखल केली होती. तिच्या मोबाईल लोकेशवरुन भंडारा पोलिसांनी तिला शोधून काढलं. तिची चौकशी केली असता, त्यात तिच्यावर भंडारा इथं सतत तीन दिवस नऊ जणांनी वेगवेगळ्या ठिकाणी सामूहिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार तिने पोलिसांना सांगितला. या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून त्यानंतर पोलिसांनी एकूण नऊ जणांना अटक केली आहे. भंडारा पोलिसांनी अटक केलेल्यांमध्ये पवन निखार (25), हितेश निनावे (26), करण खेताडे (26), निमोह उर्फ रॉनी कोटांगले (28), नितेश भोयर (30) या आरोपींचा समावेश आहे. तर अड्याळ पोलिसांनी अटक केलेल्यांमध्ये साहिल वाघमारे (22), विकास मानकर (24), शेबाज शेख (24), रवी बोरकर (22) या आरोपींचा समावेश आहे. याबाबतचे वृत्त ‘एबीपी माझा’ने दिले आहे.