जळगाव (प्रतिनिधी) जळगाव शहरातील खड्डे, साफसफाई, तसेच इतर प्रश्नावरून भाजपने महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेला चांगलेच धारेवर धरले आहे. भाजपचे जळगाव शहराचे आमदार सुरेश उर्फ राजूमामा भोळे यांनी आज पुन्हा महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेवर निशाणा साधलाय. महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना झोपेचे नाटक करीत आहे, असे आ.राजूमामा भोळे म्हणाले.
आमदार राजूमामा भोळे म्हणाले की, शिवसेनेने नगरसेवक तोडफोड करून सत्ता मिळवली परंतु त्यांना आता साधे रस्त्यावरचे खड्डे आणि साफसफाई करण्याचे काम करता येत नाही. जनता ओरडत असताना आता हे सत्ताधारी झोपल्याचे नाटक करीत आहे, त्यांना आता जनतेचा आवाज ऐकू येत नाही. भाजप महापालिकेत सत्तेत असताना आम्ही कर्जमुक्त केले, या शिवाय अमृत योजना, भुयारी गटार योजनेचे काम सुरू केले. या शिवाय आम्ही तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडून निधी मंजूर करून आणला. मात्र, महापालिकेत सत्ताधारी असलेल्या शिवसेनेच्या राज्यातील सरकारने त्याला स्थगिती दिली आहे. आज जळगावकरांच्या विकासाचा तब्बल ४२ कोटी निधी या सत्ताधाऱ्यांनी अडकवला आहे. महापालिकेतील सत्ताधारी पदाधिकाऱ्यांनी आपल्या मंत्र्याकडे जावून त्यावरील स्थगिती हटवून तो निधी उपलब्ध करावा. ही कामे न करता केवळ झोपेचे सोंग हे घेत आहेत. आणि केवळ भाजप वर टीका करीत असतात.
महापालिकेत आज सत्ताधाऱ्यांची स्थिती केविलवाणी आहे. महापौर, उपमहापौर, आणि बंडखोर नगरसेवक अशी तीन तोंडे तीन दिशेला आहेत. त्यामुळे त्यांना विकासकामे ही सुचत नाहीत. त्यांचा प्रशासनावर वचक राहिलेला नाही. सत्ताधारी शिवसेनेने झोपचे सोंग बंद करावे, प्रशासनाला कामाला लावून जळगावकरांची त्रासातून सुटका करावी. जनतेच्या प्रश्नावर आपण कोठेही सोबत येण्यास तयार आहोत तसेच वाटत असेल तर विकासाच्या प्रश्नांवर खुली चर्चा करण्याची आपली कधीही तयारी आहे, असे आव्हानही त्यांनी दिले.