पटना (वृत्तसंस्था) बिहारमधील (Bihar) समस्तीपूर जिल्ह्यात एका कुटुंबातील ५ जणांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना विद्यापतीनगर पोलीस (Police) ठाण्याच्या हद्दीतील मऊ धनेशपूर दक्षिण गावमध्ये घडली आहे. पती, पत्नीसह आई, आणि दोन मुलांनी आत्महत्या केली आहे.
रविवारी सकाळी या कुटुंबातील कोणीच घराबाहेर आले नाही, म्हणून शेजारच्यांनी दरवाजा उघडून पाहिले असता, ५ जणांचा मृतदेह मिळाला. पाचही जणांनी गळफास घेतला होता. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, माहिती मिळताच डीएसपी दिनेशकुमार पांडे यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले, आणि त्यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. पोलिसांना घटनास्थळावरून कोणतीही सुसाइड नोट सापडलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, मनोज झा (४२ वर्षे), त्यांची पत्नी सुंदरमणी देवी (३८ वर्षे), आई सीता देवी (६५ वर्षे), मुले सत्यम (१० वर्षे) आणि शिवम (७ वर्षे) हे मढ येथील वॉर्ड क्रमांक ४ मध्ये राहत होते. धनेशपूर दक्षिण गावात या कुटुंबाने सामूहिक आत्महत्या केली. एकाच कुटुंबातील पाच जणांच्या आत्महत्येमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळताच शिक्षणमंत्री विजय कुमार चौधरी यांनी उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.