नवी दिल्ली (वृत्तसंस्था) एका मुलीने मित्रासोबत मिळून तिच्या ५५ वर्षीय आईची सर्जिकल ब्लेडने गळा कापून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विशेष म्हणजे मुलीने पोलिसांसमोर एक वेगळीच कहाणी रचली त्यामुळे काहीकाळ तपास करणारे पोलीसही चक्रावले. मात्र अखेरीस हत्येचा भंडाफोड झाला आणि पोलिसांनी आरोपी मुलगी आणि तिच्या मित्राला अटक केली.
१९ फेब्रुवारी रोजी एका महिलेची अज्ञात हल्लेखोरांनी हत्या केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलीस घटनास्थळी पोहोचल्यावर घराच्या पहिल्या मजल्यावर ५५ वर्षीय महिला सुधा रानी यांचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह त्यांना आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला. मृत महिलेच्या मुलीने पोलिसांना सांगितले होते की, रात्री सुमारे ९ वाजून ३० मिनिटांनी दोघे जण घरी आले. त्यांच्या हातात बंदुका होत्या. त्यांचे चेहरे झाकलेले होते. त्यांनी आईच्या घरातील रोकड आणि दागदागिने लुटले आणि मारहाण करून ते फरार झाले. मुलीच्या जबाबावरून पोलिसांनी तसा तपास केला. मात्र तिने पोलिसांची दशाभूल करण्यासाठी ही कहाणी रचल्याचे उघड झाले. कारण मृतदेह पाहून महिलेला जास्त प्रतिकार करता आला नाही, असे दिसत होते.
मृत महिलेची मुलगी देवयानी हिचा विवाह झाला होता. तिला चार वर्षांचा मुलगा आहे, मात्र ती पतीला सोडून शिबू नावाच्या एका तरुणासोबत राहू लागली होती. दरम्यान, तिने पोलिसांना सांगितले की, आईने पतीसोबत न राहिल्यास प्रॉपर्टीमधून काढून टाकण्याची धमकी दिली होती. तसेच तिने पैसे देणेही बंद केले होते. त्यामुळे मी लिव्ह इनमधील मित्र शिबू याचा मित्र कार्तिकसोबत आईला वाटेतून बाजूला करण्याचा कट आखला. त्यानुसार आईची हत्या केली.
















