धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील पिंपळे या गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाकीत आढळले मेलेले कबुतर आढळून आल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. तीन-चार दिवसापासून दुर्गंधीयुक्त पाणी पुरवठा सुरु असल्यामुळे गावातील काही तरुण टाकीवर चढल्यावर हा किळसवाना प्रकार समोर आला.
या संदर्भात अधिक असे की, तालुक्यातील पिंपळे या गावात मागील तीन-चार दिवसापासून दुर्गंधीयुक्त पाणी पुरवठा सुरु होता. त्यामुळे गावातील काही तरुणांनी पाण्याच्या टाकीवर चढून नेमका काय प्रकार आहे?, हे बघण्याचे ठरवले. त्यानुसार दोन तरुण पाण्याच्या टाकीवर चढले. परंतू पाण्यात डोकावून बघताच त्यांना धक्का बसला. कारण पाण्याच्या टाकीत चक्क अनेक कबुतर मृतावस्थेत तरंगत होते. पाण्यात सर्वत्र कबुतरांचे पंख पसरलेले होते. या तरुणांनी पाण्यातील कबुतर काढून फेकले आहेत. परंतू आता टाकी स्वच्छ करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. दरम्यान, या घटनेमुळे गावात असंतोषाची लाट पसरली आहे.
पिंपळे हे गाव साधारण ३ हजार लोकवस्तीचे आहे. तर पाण्याच्या टाकीची क्षमता १० हजार लिटरची असल्याचे कळते. देशात एकीकडे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव साजरा होतोय. तर दुसरीकडे अद्यापही ग्रामीण भागात नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न कायम आहे. रात्री टाकीवर कबुतर बसतात. त्यातील एक कबुतर टाकीत पडले असावे. परंतू आता पाण्याची टाकी टीसीएल पावडर टाकून स्वच्छ धुण्यात आल्याची माहिती ग्रामसेवक श्री. सोनावणे यांनी दिली आहे.