भुसावळ (प्रतिनिधी) येथील वांजोळा रोडवर रिक्षाचालकासह त्याच्या परिवारातील चारही सदस्यांनी विष प्राशन करीत आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली. पोलिसांना माहिती कळताच लागलीच चारही जणांना रुग्णालयात हलविले.
यासंदर्भात अधिक असे की, वांजोळा रोडवरील प्रेरणा नगरामागे गोकुळधाम रेसीडेन्सीत विलास प्रदीप भोळे (वय ६०) हे रिक्षाचालक पत्नी व दोन मुलांसह वास्तव्यास आहेत. विलास यांच्यासह लता विलास भोळे (वय ५२), प्रेरणा विलास भोळे (वय २८), चेतन विलास भोळे (वय २७) अशी विष घेतलेल्यांची नावे आहेत. या चारही जणांनी विष घेतल्याचा प्रकार शुक्रवारी रात्री उशिरा गल्लीतील नागरिकांना समजताच त्यांनी पोलिसांना माहिती कळवली. पोलिसांनी लागलीच चारही जणांना दवाखान्यात हलविले. तातडीने उपचार करण्यात आल्याने त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्यासह बाजारपेठ पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश धुमाळ तसेच कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली.
















