जळगाव (प्रतिनिधी) वस्तू व सेवाकर (जीएसटी) गुप्तचर महासंचालनालयाच्या केंद्रीय पथकाच्या नाशिक युनिटने जामनेर तालुक्यातील पहूर येथे टाकलेल्या धाडीतून चकित करणारी नवनवीन माहिती समोर येत आहे. त्यानुसार आता डीजीजीआयच्या पथकाने ताब्यात घेतलेल्या इटकरे नामक संशयिताकडे मागील महिन्यात २३ लाखाची घरफोडी झाल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार हा जीएसटी घोटाळा १०० कोटीच्या घरात आहे. जवळपास १०० हून अधिक खात्यातून हा व्यवहार झाला असून मुख्यसूत्रधार तथा लाभार्थी जळगावचा असल्याचे समोर आले आहे. डीजीजीआयच्या पथकाने पहूर येथून कैलास भारुडे तर जळगाव येथून पिंटू इटकरे या दोघांना ताब्यात घेतले होते. दोघांना आज नाशिक न्यायालयात हजर करण्यात आले होते. दरम्यान, यातील पिंटू इटकरे याच्या घरी लाखोची घरफोडी झाली होती. दौलत नगर परिसरात पिंटू बंडू इटकरे (वय ३५) हा आपल्या पत्नी आणि मुलीसह राहतो. ३ फेब्रुवारी २०२१ रोजी पहाटे सव्वातीन वाजेच्या सुमारास सर्व जण गाढ झोपेत असतांना सहा अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला. त्यांनी इटकरेंची पत्नी मनिषा यांना तोंड दाबून उठविले. तर पिंटू इटकरेला चाकू लाऊन घरात काय जे असेल ते काढून देण्यासाठी धमकावले.
घाबरलेल्या इटकरेने घरातील तीन लाखाची रोकड आणि २० लाखांचे दागिने काढून दिले. ऐवज मिळताच चोरट्यांनी पळ काढला. या सहा दरोडेखोरांपैकी पाच जणांनी संपूर्ण चेहरा झाकला जाईल असा बुरखा घातला होता. तर सहाव्याने तोंडावर विदूषकाचा मास्क लावला होता. चोरटे सव्वा तीन ते चार वाजेपर्यंत ते इटकरेच्या घरात होते. चोरट्यांनी सीसीटिव्हीचा डीव्हाआर देखील काढून नेला होता. तसेच इटकरे पती-पत्नी या दोघांचा मोबाईल घेऊन तो खाली फेकून दिला होता. याबाबत रामानंद नगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, ३ फेब्रुवारीला चोरी आणि त्यानंतर ३ मार्चला धाडसत्र हा विचित्र योगायोगा जुळून आला आहे.