धरणगाव (प्रतिनिधी) स्किल रूट्स संस्थेतर्फे आयोजित मोफत कौशल्य विकास कार्यक्रम आज संपन्न झाला. विक्रम ग्रंथालय व मोफत वाचनालय या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून प्रा. आर. एन. महाजन (केंद्रीय सदस्य, समरसता मंच तसेच अध्यक्ष विक्रम ग्रंथालय व मोफत वाचनालय) व रमेश काबरा हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते एच. आर आणि कॉर्पोरेट ट्रेनर सौ. सुप्रिया काबरा (मुंबई) यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
करिअर घडवण्यासाठी कौशल्यांचा विकास करण्याशिवाय पर्याय नाही. पण, कोणकोणत्या कौशल्यांवर लक्ष केंद्रीत केलं पाहिजे याबाबत अनेकांचा गोंधळ उडतो. आजच्या स्पर्धात्मक युगात टिकून राहायचं असेल स्किल्सचा विकास करावा, असे प्रतिपादन महाजन यांनी केले. सौ. सुप्रिया काबरा यांनी विद्यार्थ्यांना काही खेळ/ उपक्रम व अनुभवांद्वारे मार्गदर्शन केले. हे सॉफ्ट स्किल्स, काय आहे? आजकाल कंपन्यांना शैक्षणिक पात्रतेबरोबरच आणखी काही विशिष्ट गुणांची/ कौशल्यांची (स्किल्स) गरज असते. करिअरच्या प्रत्येक टप्प्यावर किंवा प्रत्येक मजल सर करताना या स्किल्स खूप महत्त्वाच्या ठरतात. नुसतंच तांत्रिक किंवा विषयाचं ज्ञान असून चालत नाही, म्हणजेच नुसत्याच पुस्तकी ज्ञानावर नोकरी मिळवणं आणि टिकवणं आता कठीण झालं आहे. पदवी मिळवल्यावर आपण गृहीत धरू शकतो की विषयाचं ज्ञान असेल. पण, विषयावरच्या प्रभुत्वावर आपण बोलू शकत नाही. ऑफिसमध्ये काम करण्यासाठी लागणारं कौशल्य (स्किल्स) ही वेगळीच असतात. नुसतंच टेक्नॉलॉजीवर प्रभुत्व असून चालत नाही. पण, संभाषण कौशल्य , लेखन कौशल्य, प्रेझेंटेशन स्किल्स, निर्णयक्षमता, सर्जनशीलता, समूहात/लोकांबरोबर काम करण्याचं कौशल्य, भावनिक बुद्धिमत्ता, नेतृत्व गुण ,वेळेचं नियोजन, समस्यांचं निरसन करण्याची क्षमता असे आणि असे बरेच कौशल्य आज करिअर टिकवण्यासाठी आणि घडवण्यासाठी महत्त्वाची ठरतात.
कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अखिल काबरा यांनी केले, तर आगामी कार्यक्रम व आभार प्रदर्शन इच्छेश काबरा यांनी केले. येत्या १२ आणि १३ ऑगस्टला संभाषण कौशल्य या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.