नागपूर (वृत्तसंस्था) नजीकच्या चाकडोह (बाजारगाव) येथील सोलर एक्सप्लोसिव्ह कंपनीत रविवारी सकाळी नऊ वाजता झालेल्या भीषण स्फोटात सहा महिलांसह तीन पुरुष अशा एकूण नऊ कामगारांचा जागीच मृत्यू झाला. सुदैवाने एक कामगार बचावला. या घटनेमुळे संपूर्ण नागपूर हादरले. घटनास्थळी बचावकार्यासाठी सर्व यंत्रणा तैनात करण्यात आल्या. सुरक्षेच्या दृष्टीने कंपनीतील संवेदनशील परिसर रिक्त करण्यात आला.
नागपूर-अमरावती महामार्गावर कोंढाळीपासून दहा किमीवर असलेल्या सोलर एक्सप्लोसिव्ह कंपनीतील सीबीएच-दोन इमारतीत सकाळी सहा ते दुपारी दोन वाजता टीएनटी, आरडीएक्स व एचएमटी या स्फोटक पदार्थांच्या पॅकिंगचे काम सुरू होते. काही कळायच्या आत भीषण स्फोट झाला. या स्फोटात सहा महिला व तीन पुरुष अशा नऊ कामगारांचा जागीच मृत्यू झाला. युवराज किसनाजी चारोडे (रा. बाजारगाव, ता. काटोल, जि. नागपूर), ओमेश्वर किसनलाल मच्छिर्के (रा. चाकडोह, ता. काटोल, जि. नागपूर), मिता प्रमोद उईके (रा. अंबाडा सोनक, ता. काटोल, जि. नागपूर), आरती नीळकंठ सहारे (रा. कामठी मासोद, ता. काटोल, जि. नागपूर), श्वेताली दामोदर मारबते (रा. कन्नमवार, ता. जि. वर्धा), पुष्पा श्रीरामजी मानापुरे (रा. शिराळा (तेलीपुरा), ता.जि. अमरावती), भाग्यश्री सुधाकर लोणारे (रा. भुज, ता. ब्रह्मपुरी, जि. चंद्रपूर), रुमिता विलास उईके (रा. ढगा, ता. कारंजा, जि. वर्धा) व मोसम राजकुमार पटले (रा. नेहरू वॉर्ड, पाचगाव, ता. मोहाडी, जि. भंडारा) अशी मृतांची नावे आहेत.
स्फोट इतका भयावह होता की, सीबीएच क्रमांक दोन प्रकल्पाची संपूर्ण इमारत कोसळली. या इमारतीत काम करणारे संजय गुलाबराव आडे (५१, रा. बाजारगाव) हे भीषण स्फोट झालेल्या इमारतीच्या बाजूच्या प्रकल्पात काम करत होते. त्यांना कंपनी सुपरवायझर मृत मोसम पटले यांनी रिकामे खोके बाहेर ठेवण्यासाठी पाठवले होते. ते खोके बाहेर ठेवून प्रकल्पात परत येताना सीबीएच प्रकल्पापासून शंभर मीटरवर ते असताना भीषण स्फोट झाला. कामगार संजय आडे यांच्या डोळ्यांदेखत ही इमारत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे उद्ध्वस्त झाली. कंपनी सुपरवायझर मोसम पटले यांचे आडे यांच्याशी ते शेवटचे बोलणे ठरले. मात्र यात संजय आडे सुदैवाने बचावले.
सोलर एक्सप्लोसिव्ह ही देशातील सर्वात मोठी स्फोटके बनवणारी कंपनी आहे. ही कंपनी भारतीय संरक्षण दलाकरिता स्फोटकांचे उत्पादन करते. येथून भारतीय लष्कर, नौदलासाठी लागणाऱ्या विविध शस्त्रास्त्रांचे उत्पादन होते. या कंपनीद्वारे भारताबाहेर तीसहून अधिक देशांमध्ये शस्त्रास्त्रांची निर्यात करण्यात येते. ही कंपनी एकूण ५३७ हेक्टर भागांत विस्तारली आहे. या ठिकाणी तीन पाळीत दोन हजार कामगार काम करतात. त्यापैकी ७५ टक्के कामगार स्थानिक आहेत.