मुंबई (वृत्तसंस्था) सोमय्यांना उत्तर द्यायला मी बांधिल नाही त्यांनी माफी मागावी अन्यथा १०० कोटी द्यावे, असा इशारा परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिला आहे. रत्नागिरी दौऱ्यादरम्यान आज अनिल परब यांनी मुरुड साई रिसॉर्टवरून किरीट सोमय्यांनी केलेल्या आरोपांना चोख प्रतिउत्तर दिले आहे.
किरीट सोमय्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. पण मी किरीट सोमय्यांना बांधील नाही. किरीट सोमय्या मला प्रश्न विचारू शकत नाहीत. ज्या अधिकृत संस्थांनी- यंत्रणांनी मला प्रश्न विचारले आहेत त्यांना मी उत्तरे दिली आहेत. जिल्हाधिकारी, पोलिसांसमोर सर्व कागदपत्रं आहेत. या रिसॉर्टशी माझा संबंध नाही हे मी वारंवार सांगत आहे. पण बदनानी कऱण्यासाठी जाणूनबुजून माझा संबंध जोडत आहेत. शासकीय यंत्रणा याबाबत योग्य ती कारवाई करतील,” असं अनिल परब यांनी यावेळी सांगितलं.
“जाणूनबुजून संबंध जोडायचा आणि माझी, महाविकास आघाडी, मुख्यमंत्र्यांची बदनामी करायची हा किरीट सोमय्यांचा धंदा आहे. मी अब्रूनुकसानीचा दावा हायकोर्टात दाखल केला आहे, डिसेंबरमध्ये ही केस येईल. किरीट सोमय्या यांना माफी मागावी लागेल किंवा १०० कोटी रुपये द्यावे लावतील,” असा इशारा अनिल परब यांनी यावेळी दिला.