पुणे (वृत्तसंस्था) “जर कोणी अजितदादांना त्यांच्या पक्षात सहभागी होण्याचे वचन दिलं असेल, तर त्यांनी त्यांचं स्वागत केलं पाहिजे. काही लोकांनी आम्हाला देखील वचन दिलं आहे. परंतु आम्ही याबद्दल बोलत नाही, आम्ही करून दाखवतो. असं म्हणत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.
भाजपामध्ये गेलेले अनेकजण परत येण्याच्या तयारीत आहे. शिवाय, पुणे, पिंपरी-चिंचवडमधील काही नेत्यांना परत यायची इच्छा असून, लवकरच त्यांचे स्वागत केले जाईल.” असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज माध्यमांशी बोलताना आगामी काळात भाजपाला धक्का बसण्याचे संकेत दिले होते. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच, “अजित पवार जर इतरांच्या आमदारांबद्दल बोलत असतील तर त्यांच्यासोबतचे २८ आमदार का टिकले नाहीत? याचे त्यांनी उत्तर द्यावे. जर त्यांच्यासोबतचे २८ आमदारच टिकले नाहीत तर इतर पक्षांतील आमदार त्यांच्याकडे कसे येतील?” असा प्रश्न देखील चंद्रकांत पाटील यांनी विचारला आहे. तर, या अगोदर विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी, “आगामी काळात भाजपामध्ये अनेकांचा प्रवेश होणार आहे. मात्र, काहीजण उगाचच वावड्या उठवत आहेत की, भाजपाचे आमदार आमच्याकडे येणार. अशा वावड्या उठण्याचं एकमेव कारण म्हणजे कुणी त्यांच्याकडे जाणार नाही हे त्यांना देखील माहिती आहे. पण त्यांच्या पक्षामध्ये एवढी प्रचंड अस्वस्थता आहे व आमदरांमध्ये एवढी जास्त नाराजी आहे. की हे आमदार काय करतील? अशा प्रकारची भीती मनात असल्यामुळेच त्यांना संकेत देण्यासाठी उगाचच पक्ष प्रवेशाच्या वावड्या उठवल्या जात आहेत.” असं नाशिकमध्ये बोलून दाखवलं होतं.















