शिर्डी (वृत्तसंस्था) कौटुंबिक वादातून जावयाने सासुरवाडीतील सहा जणांना चाकूने भोसकल्याची भीषण घटना शिर्डी परिसरातील सावळीविहीर येथे गुरुवारी मध्यरात्री बारा वाजेच्या सुमारास घडली होती. या हल्ल्यात पत्नीसह मेव्हणा आणि आजेसासू या तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर हल्लेखोराची सासू, सासरे आणि मेव्हणी हे गंभीर जखमी झाले होते.
या घटनेत आरोपीचा मेहुणा रोहित चांगदेव गायकवाड (वय-२५), पत्नी वर्षा सुरेश निकम (वय-२४) व आजीसासू हिराबाई गायकवाड (वय ७०) यांचा मृत्यू झाला. तर आरोपीची सासू संगीता चांगदेव गायकवाड (वय ४५), सासरे चांगदेव गायकवाड (वय ५५) व मेहुणी योगिता महेंद्र जाधव (वय ३०) हे गंभीर जखमी झाले जखमींवर साईबाबा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सासुरवाडीतील दिसेल त्या व्यक्तीवर चाकूने वार केल्यानंतर आरोपी जावई आणि त्याचा भाऊ नाशिकच्या दिशेने पसार झाले. मात्र अवघ्या पाच तासांत शिर्डी पोलिसांनी त्यांना अटक केली.
आरोपी सुरेश ऊर्फ बाळू विलास निकम याचा वर्षा हिच्याबरोबर नऊ वर्षांपूर्वी विवाह झाला होता. विवाहानंतर तो दारू पिवून पत्नीस सतत शिवीगाळ करून त्रास देत होता. या त्रासाला कंटाळून वर्षा आपल्या मुलींसोबत माहेरी राहावयास गेली होती. गेल्या महिन्यात वर्षांने संगमनेर पोलीस ठाण्यात पतीविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यावर त्याने सासुरवाडीला येऊन पत्नी आणि सासू यांना शिवीगाळ केली. त्यावरून त्याच्याविरुद्ध शिर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. याच रागातून सुरेश याने सासुरवाडीतील तिघांचा जीव घेतला.
गुरुवारी रात्री बाराच्या सुमारास सुरेश व त्याचा चुलतभाऊ रोशन कैलास निकम (दोघे रा. संगमनेर ) हे सावळीविहीर येथे आले होते. हे सावळीविहीर येथे आले होते. घराचा दरवाजा उघडताच सुरेशने पत्नी वर्षावर मेव्हणा रोहित चांगदेव गायकवाडवर आणि आजेसासू हिराबाई धृपद गायकवाड या तिघांवर धारदार चाकूने वार करत त्यांचा खून केला.
सासू संगीता गायकवाड, सासरे चांगदेव गायकवाड आणि मेव्हणी योगीता जाधव या तिघांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला. हत्याकांडानंतर दोन्ही आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. जखमींचा आरडाओरडा ऐकून आजूबाजूचे रहिवासी तेथे आले. गंभीर जखमी झालेल्यांना त्यांनी तातडीने शिर्डी येथील साईबाबा संस्थानच्या रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. यानंतर तपासचक्र फिरवीत सुरेश व रोशन यांना अटक केली.