धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यात वाळू माफियांनी वेगवेगळ्या ठिकाणी साठे मारून ठेवलेले आहेत. तसेच रात्रीच्यावेळी नदीतून वाळू चोरीचे प्रमाण देखील वाढले आहे. त्यामुळे अवैध रेती उत्खनन रोखण्यासाठी धरणगाव तहसीलदार नितीनकुमार देवरे यांनी रात्रगस्त पथके तयार केली आहेत.
येथील तालुक्यातील आव्हाने बांबोरी प्रचा व नारणे हे रेती घाट फेब्रुवारी महिन्यामध्ये लिलाव झाल्यानंतर लिलाव धारकांकडे ताब्यात देण्यात आले आहे. परंतु सदर लिलाव धारकांनी आव्हाने व नारणे हे रेती घाट शासनाला परत करत असल्याची बाब लक्षात घेऊन बंद केले आहेत. धरणगाव तालुक्यात वाळू माफियांनी वेगवेगळ्या ठिकाणी साठे मारून ठेवलेले असून ते रात्री नदीतून वाळू चोरीचे प्रमाण वाढले आहे. महिन्याभरापासून नदी पात्रातील वाळू उपसा बंद झालेला आहे. याचा गैरफायदा इतर रेती माफिया घेत असल्याची बाब दिसून आल्यावरून जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व खनिकर्म अधिकारी प्रवीण चव्हाण यांच्या मार्गदर्शनात तहसीलदार नितीनकुमार देवरे यांनी आजपासून नायब तहसीलदार यांच्या नियंत्रणाखाली मंडळाधिकारी तलाठी पोलीस पाटील व कोतवाल यांचे रात्रगस्त पथक नेमले आहे.
दि. १७ व १८ रोजी रात्री स्वतः तहसीलदार नितीनकुमार देवरे यांनी पथकासोबत नारणे, बाभूळगाव, चमगाव, आव्हाने व बांबोरी प्रचा येथील रेती घाटांची पाहणी केली. यानंतर जर रात्री अथवा दिवसा रेती माफिया त्यांच्या वाहनासह आढळून आल्यास त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे धरणगाव तहसीलदार नितीनकुमार देवरे यांनी सांगितले आहे.