जालना (वृत्तसंस्था) जालना-वडीगोद्री महामार्गावरील मठतांडा गावाजवळ शुक्रवारी एसटी बस व आयशर ट्रकची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात बसमधील वाहकासह अन्य तीन प्रवाशी व ट्रकमधील चालक, वाहक असे सहा जण जागीच ठार झाले आहेत. तर एसटी बसमधील २३ प्रवाशी जखमी झाले असून, त्यात बालकांसह वृद्धांचाही समावेश आहे. यापैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे.
या अपघातात जखमी झालेले बसचालक गोरक्षनाथ खेत्रे (३७) यांनी सांगितले की, गेवराई आगाराची बस ही गेवराईहून २७ प्रवाशी घेऊन जालन्याकडे निघाली होती. तर आयशर ट्रक जालन्याहून बीडच्या दिशेने जात होता. भरधाव आयशर त्याच्या पुढे समोर असणाऱ्या वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात मठतांडा येथील गट क्रमांक १० जवळ जालन्याकडे येणाऱ्या एसटी बसला धडकला. ही धडक एवढी भीषण होती की, दोन्ही वाहनांच्या समोरच्या भागाचा अक्षरशः चुराडा झाला. बसमधील वाहक बंडु बारगजे (५३) यांच्यासह पंचफुला सोळुंके (६५), आयशर क्लीनर सतीश नाईक (२९), आयशर चालक शेख जब्बार (५२), राहिबाई कळसाईत (६५) व अन्य एक महिला असे सहा जण ठार झाले.
दरम्यान, आयशरमधील संत्र्यांचे करेट्स बसच्या कॅबिनमध्ये घुसून अडकले, तर काही रस्त्यावर अस्ताव्यस्त पडले. या वेळी भीषण अपघाताने हादरून गेलेल्या बसमधील प्रवाशांनी मदतीसाठी धावा केला. स्थानिक नागरिकांनी अपघातस्थळी पोहचून मदतकार्य सुरू केले. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने जखमींना बाहेर काढून रुग्णवाहिकेतून तातडीने उपचारासाठी अंबड येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविले.
या अपघातात कार्तिक कुऱ्हाडे (३), कलाबाई कुऱ्हाडे (७०), चुसेरा बागवान (४), आफिफा बागवान (१३), आरसिया बागवान (४५), सिद्धेश्वर क्षीरसागर (१२), गणेश क्षीरसागर (३६), बसचालक गोरक्षनाथ खेत्रे (३७), भारत हिंदुडे (५५), प्रभाकर गाडेकर (५५), कमल गाडेकर (५०), बापुराव निकम (५३), शिफा बागवान (१०), विजयकुमार राय (२०), कमल राय (४०), भारत क्षीरसागर (३६), ओमकार घुंगासे (१७), अंजली घुंगासे (१७), अफसाना शेख (३), सायली सपकाळ (१९), तौफिक जाफर शेख (२८), राम पवार (४५), हनुमान गोंडगे अशी जखमींची नावे आहेत.
जालना-वडीगोद्री मार्गावरील मठतांडा येथे आयशर ट्रक व बसचा भीषण अपघात झाल्याचे समजताच मठजळगावसह आजूबाजूच्या गावांतील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. तीर्थपुरी ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस उपनिरीक्षक प्रतिभा पठाडे या शुक्रवारी सकाळी बंदोबस्तकामी याच मार्गावरून अंतरवाली सराटी येथे जात होत्या. त्यांच्या समोरच ही दुर्घटना घडली. त्यांनी तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांना या अपघाताची माहिती देऊन सर्वप्रथम स्थानिक नागरिकांच्या मदतीने मदतकार्य सुरू केले. गोंदी ठाण्याचे सहायक निरीक्षक आशिष खांडेकर यांनीही कर्मचाऱ्यांसह घटनास्थळाकडे धाव घेतली.