मुंबई (वृत्तसंस्था) ऐन सणासुधीच्या काळात एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. यापुढे एसटीने प्रवास करताना प्रवाश्यांच्या खिशाला आणखी कात्री लागणार आहे. दिवाळीच्या तोंडावर एसटी महामंडळाने प्रवास दरात १७.१७ टक्क्यांनी भाडेवाढ केली आहे. त्यामुळे आजपासून एसटीने प्रवास करणाऱ्यांना जास्त पैसे मोजावे लागणार आहे.
महामंडळाच्या सर्व प्रकारच्या प्रवासी सेवांना भाडेवाढ लागू होईल. ही वाढ किमान ५ रुपयांपासून १८५ रुपयांपर्यंत आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर प्रवाशांना जादा भाडे मोजावे लागणार आहे. नव्या भाडेवाढीनुसार साधी गाडी, शयन-आसनी, शिवशाही तसेच शिवनेरी व अश्वमेधच्या पहिल्या टप्प्यासाठी भाडेवाढ होणार नसून, दुसऱ्या टप्प्यानंतर म्हणजेच सहा किलोमीटरनंतरच्या तिकिटाच्या दरात वाढ होणार आहे. ही दरवाढ ५ रुपयांच्या पटीत आहे. भाडेवाढीमुळे दादर ते स्वारगेट शिवनेरीचे तिकीट दर ४५० रुपयांवरून ५२५ रुपये झाले आहे. मुंबई ते दापोली साध्या बसचे दर २९० रुपयांवरून ३४० रुपये, मुंबई ते विजयदुर्गपर्यंत साध्या बसच्या दरात १०५ रुपयांनी वाढ असून, आता ७३० रुपये मोजावे लागतील. मुंबई ते औरंगाबाद साध्या बसचा प्रवासही १२० रुपयांनी महागला असून ७४० रुपयांवरून तिकीट ८६० रुपये झाले आहे.
गेल्या तीन वर्षांत इंधनाच्या दरात भरमसाट वाढ झाली आहे. दिवसेंदिवस हे दर वाढत असले तरी एसटी महामंडळाने प्रवासी दर मात्र स्थिर ठेवले होते. अशा परिस्थितीतही एसटी महामंडळाने कुठल्याच प्रवासी वाहतुकीच्या दरात वाढ केलेली नव्हती. वाढत्या इंधनदराचा बोजा सहन करत एसटी प्रवाशांच्या सेवेसाठी धावत आहे. मात्र, महामंडळाच्या तिजोरीवर त्याचा परिणाम जाणवू लागल्याने नाइलाजास्तव ही तिकीट दरवाढ करण्यात येत असल्याचे एसटी महामंडळाने म्हटले आहे.
साध्या बसचे नवीन तिकीट दर
मार्ग सध्याचे तिकीट दर नवीन तिकीट दर
मुंबई ते अलिबाग १३५ रु. १६० रु.
मुंबई ते कोल्हापूर ४८५ रु. ५६५ रु.
मुंबई ते जळगाव ५४५ रु. ६३५ रु.
मुंबई ते नाशिक ३४५ रु. ४०० रु.
पुणे ते औरंगाबाद २९० रु. ३४० रु.
पुणे ते नाशिक २७० रु. ३१५ रु.
पुणे ते पंढरपूर २७० रु. ३१५ रु.
नाशिक ते कोल्हापूर ५७५ रु. ६७० रु.
नाशिक ते पंढरपूर ४७० रु. ५५० रु.
औरंगाबाद ते लातूर ३६० रु. ४२० रु.