धरणगाव (प्रतिनिधी) महराष्ट्रातील ग्रामीण भागात इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यासाठी शासनाने परवानगी दिलेल्या आहे. मात्र, शहरातील प्राथमिक माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा, आणि महाविद्यालय अजूनही बंद आहेत. शिक्षणाचे हे वर्ग सुरू करावेत, अशी मागणी धरणगाव तालुक्यातील शिक्षक संघटनांनी तहसीलदार, गटशिक्षण अधिकारी, मुख्याधिकारी नगरपालिका यांच्याकडे आज एका निवेदनाद्वारे केली आहे.
कोविड-१९ च्या आपत्तीमुळे गेल्या अठरा महिन्यापासून शाळा महाविद्यालय बंद आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. सध्या कोविड-१९ची परिस्थिती बऱ्यापैकी सुधारलेली दिसते. शिवाय शासनाने ग्रामीण भागातील शाळा, महाविद्यालय सुरू करण्यास परवानगी दिल्याने ग्रामीण भागात शाळा सुरू झालेल्या आहेत. मात्र, धरणगाव शहरातील ५ माध्यमिक, १ उर्दू माध्यम, ६ खाजगी प्राथमिक शाळा बंद आहेत. शहरातील या शाळा सुरू करण्यात यावे, अशी मागणी पालक वर्ग देखील करीत आहे. ग्रामीण भागात शाळा सुरू असल्यामुळे शहरी भागातील विद्यार्थी आणि पालक वर्ग विद्यार्थ्यांच्या भवितव्यबाबत चिंतेत आहेत. ऑनलाईन शिक्षणाचे फारसे समाधानकारक परिणाम झालेला दिसून येत नाही. धरणगाव शहरात शिक्षणासाठी येणारे बरेच विद्यार्थी तालुक्यातील खेड्यावरुन येत असतात. ग्रामीण भागात शाळा सुरू असल्यामुळे शहरात शिक्षण घेणाऱ्या या विद्यार्थांच्या मनात गोंधळ निर्माण झालेला आहे. पालक, विद्यार्थी आणि शिक्षक या सर्व घटकांना आता शाळा सुरू झाल्या पाहिजेत, असेच वाटत आहे. त्यासाठी शासनाने तातडीने शाळा सुरू करणेबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी करणारे निवेदन नायब तहसीलदार प्रथमेश मोहळ, गटशिक्षण अधिकारी अशोक बिऱ्हाडे, नगरपालिका मुख्याधिकारी जनार्दन पवार यांना देण्यात आले.
यावेळी मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष एस एस पाटील, माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष सी के पाटील, टीडीएफचे अध्यक्ष डी एस पाटील, उपाध्यक्ष पी डी पाटील, कनिष्ठ महाविद्यालय संघटनेचे अध्यक्ष एस झेड पाटील, शिक्षकेतर, कर्मचारी, संघटनेचे प्रतिनिधी तेजेंद्र चंदेल, पी आर हायस्कूलचे मुख्याध्यापक डॉ. संजीव कुमार सोनवणे ,अँग्लो उर्दू हायस्कूलचे मुख्याध्यापक शकील शेख, बालकवी विद्यालयाचे मुख्याध्यापक विक्रमादित्य पाटील, इंदिरा गांधी विद्यालयाचे एन बी पाटील, डी एन पाटील, आदर्श विद्यालयाचे मुख्याध्यापक एस एस सोनवणे, महात्मा फुले हायस्कूलचे पर्यवेक्षक एस व्ही आढावे, जुक्तोचे विभागीय प्रतिनिधी प्रा डी डी पाटील, कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयचे प्रा. रेखा बिरारी, कोळी, ग.स. चे माजी संचालक जीवन पाटील यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते.