भुसावळ (प्रतिनिधी) तालुक्यातील वांजोळा गावात काही दिवसापुर्वी बालिकेवर बलात्कार झाला असून संबंधित आरोपीला अटक करण्यात आली आहे. पिडीतेच्या परिवाराला धमकावण्याचे प्रयत्न सुरु असल्यामुळे पिडीतेच्या कुटुंबाला पोलीस संरक्षण मिळावे, अशा मागणीचे निवेदन भिम आर्मी जिल्हा युनिटवतीने देण्यात आले आहे.
याबाबत निवेदनात म्हटले आहे की, येथे दि. 14 ऑक्टोबर रोजी भुसावळ तालुक्यात एक ह्रदय पिळवटून टाकणारी समाज मन सुन्न करणारी दुर्दैवी घटना घडलेली आहे. वांजोळा गावी एका साधारण कुटुंबातील लहान बालिकेवर बलात्कार झालेला आहे. त्यात आरोपीला अटक सुद्धा झालेली आहे. पण आरोपीसह आरोपीचे नातलग त्या पिडीत मुलीच्या परिवारातील लोकांना धमकावण्याचे प्रयत्न करीत आहेत. म्हणून जो पर्यंत हा खटला न्याय प्रविस्ठ राहील तो पर्यंत पिडीत कुटुंबाला पोलीस संरक्षण मिळावे, अशी मागणी भिम आर्मी जिल्हा युनिटच्या माध्यमातून करण्यात आली आहे. संबंधित प्रकरणात पिडितेवर दुर्दैवी प्रकार घडलेला असून त्या मुलीला स्थानिक आमदार निधीतून तत्काळ मदत म्हणून 10 लाख रुपये अदा करण्यात यावे. पिडीता जन्मताच मुकबधीर आहे. म्हणून शासन स्थरावरुन पिडीत मुलीच्या शिक्षणाची सर्व जबाबदारी महाराष्ट्र शासनाने घ्यावी व तिला 25 लाख रु राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाकडून अदा करण्यात यावे असे निवेदनात म्हटले आहे.