धरणगाव (प्रतिनिधी) येथील महात्मा गांधी उद्यानातील वृक्ष न तोडता त्यांना सामावून घेत विकासकामे करण्यात यावी, तसेच झाडांचे पुनर्वसन करण्याच्या नवीन पद्धतींचा वापर करून झाडे वाचविण्यात यावीत, अशा आशयाचे निवेदन जलदूत फाऊंडेशनतर्फे धरणगाव पालिकेचे मुख्याधिकार्यांना आज देण्यात आले.
धरणगाव नगर पालिकेतर्फे विविध विकास कामांसाठी अडथळा असल्याचे सांगून महात्मा गांधी उद्यानातील एकूण १९ झाडे तोडण्यासंदर्भात नोटिस काढण्यात आली होती. त्याअनुषंगाने जलदूत फाऊंडेशन धरणगावच्या सदस्यांनी महात्मा गांधी उद्यानातील सर्व १९ झाडांची पाहणी केली असता असे आढळून आले की, त्यातील केवळ ७ झाडे कमकुवत/ जळालेली/ तोडण्यायोग्य आहेत. उर्वरित १२ झाडे ही सुस्थितीत असून जीवंत आहेत. हे वृक्ष न तोडता त्यांना सामावून घेत विकासकामे करण्यात यावीत, सदर झाडांचे पुनर्वसन करण्याच्या नवीन (इन्नोवेटीव) पद्धतींचा वापर करून सदर झाडे वाचविण्यात यावीत, यासाठी आपण योग्य पर्यायांचा वापर करून सदर झाडे वाचवावीत, असे निवेदन जलदूत फाऊंडेशन धरणगावतर्फे मुख्याधिकारी धरणगाव नगरपरिषद यांना देण्यात आले.
यावेळी जलदूत फाऊंडेशन धरणगावचे सदस्य ए. आर. पाटील, तोडे, डॉ. सूचित जैन, डॉ. पंकज अमृतकर, इंजि. सुनील शाह आदी उपस्थित होते.