जळगाव (प्रतिनिधी) एकनाथराव खडसे ग्रामीण पतसंस्था,लोककल्याण ग्रामीण पतसंस्था, महात्मा फुले अर्बन को.ऑप सोसायटी, धनवर्धिनी या संस्थेमधील ठेवी परत तात्काळ परत मिळाव्यात. तसेच संबधीत पतसंस्थेच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत ठेविदारांसोबत आज माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन दिले.
यादव जगन्नाथ पाटील, प्राजक्ता यादव पाटील, प्रथमेश पाटील, ज्ञानदेव किटकुल भंगाळे (रा. हरविठठल नगर तळवेल ता.भुसावळ) आणि आशाबाई प्रकाश चौधरी (रा. वरणगाव) यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आम्ही वरील पतसंस्थांमध्ये ठेवलेल्या ठेवींची पावतीची मुदत संपल्यानंतर देखील आजपावेतो देत नसुन सदरची ठेव रक्कमेची वेळावेळी मागणी केली असता ती जाणीवपुर्वकरित्या देण्यास टाळाटाळ करीत असुन त्यांचा अप्रमाणीक व लबाड हेतु दिसुन येत आहे.सदरहु सोसायटी ही सहकारी संस्था अधिनियम 1960 अन्वये नोंदणी झालेली असुन आपले जिल्हयातील सदरहु संस्थेवर नियंत्रण व आपल्या देखरेखीखाली चालवित असते जिल्हाधिकारी या नात्याने त्यांच्यावर कारवाई करण्याचा आपणास पुर्ण अधिकार आहे. सदरहु संस्थेत आम्ही वेळोवेळी सदरच्या रक्कमेची मागणी करून देखील ती देण्यास ते टाळाटाळ करीत आहे. सोसायटीमध्ये नमुद केलेल्या सोसायटयांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर स्वरूपाची कारवाई करण्यात येवुन उपरोक्त नमुद केलेल्या ठेव पावती व बचत खात्याची रक्कम आम्हास त्वरीत अदा करण्याबाबत आदेश व्हावा ही विनती, असे म्हटले आहे. यावेळी पिडीत ठेवीदारांसह माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता उपस्थित होते.