जळगाव (प्रतिनिधी) बोदवड नगरपंचायत निवडणूकीत (Bodwad Nagar Panchayat Election) राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांना धक्का देण्यासाठी भाजप-शिवसेना आमदारांची बंद दाराआड खलबतं झाल्याची माहिती समोर येत आहे.
चार जागांसाठी उद्या मतदान
बोदवड नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात चार जागांसाठी उद्या मतदान होत आहे. तर, १९ जानेवारी रोजी मतमोजणी होऊन निकाल स्पष्ट होणार आहे. तर दुसरीकडे खडसेंना धक्का देण्यासाठी भाजपचे आमदार गिरीश महाजन व शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील एकत्र आल्याची चर्चा आहे.
खडसे-महाजन पुन्हा एकदा आमनेसामने
या निवडणुकीत एकनाथराव खडसे व गिरीश महाजन पुन्हा एकदा आमनेसामने उभे ठाकले आहेत. प्रचाराच्या दरम्यान दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर टीकेच्या तोफा डागल्या होत्या. त्याचबरोबर पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी देखील ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. मतदान तोंडावर आलेलं असतानाच रविवारी बोदवड इथं गिरीश महाजन व मुक्ताईनगरचे शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांची बंद दाराआड बैठक झाली.
बोदवडची निवडणूक प्रतिष्ठेची
राज्यात महाविकास आघाडीमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र असले, तरी जळगावमध्ये मात्र राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन पक्षांमध्ये कलह असल्याचं दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि एकनाथ खडसेंच्या कन्या रोहिणी खडसे यांनी स्थानिक शिवसेना आमदारांवर गंभीर आरोप केले आहेत. हे प्रकरण तापल्यानंतर शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील यांनी देखील रोहिणी खडसे यांच्याकडून आपल्या जीवाला धोका असल्याची तक्रार केली होती. तर यानंतर चक्क रोहिणी खडसेंवर हल्ला झाला होता. त्यामुळे बोदवडची निवडणूक खासकरून खडसे आणि महाजन यांच्यासाठी प्रतिष्ठेची बनली आहे. कारण जिल्हा बँकेनंतर खडसे पुन्हा एकदा गिरीश महाजन यांना धक्का देण्याची योजना आखताय. तर दुसरीकडे महाजन हे जिल्हा बँकेचा वचपा काढण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही : आ. चंद्रकांत पाटील
उमेदवारांच्या प्रचारासाठी गेलो असताना एका प्रभागात गिरीश महाजन यांची भेट झाली. त्यावेळी आमच्यात औपचारिक चर्चा झाली. या भेटीचा कुठलाही वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही. जे लोक तसं करत असतील त्यांच्या बुद्धीचं दिवाळं निघालं आहे, अशी प्रतिक्रिया आ.चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.