मुंबई प्रतिनिधी । महाराष्ट्रात कोरोना रूग्णांची संख्या वेगाने वाढत असताना वारंवार विनंती करूनही कोरोना चाचण्यांची संख्या वाढत नाही. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने महाराष्ट्र सरकारला इशारा दिला आहे की, याचा गंभीर परिणाम झाल्याने कोरोना रूग्ण आणि मृत्यूची संख्या वाढेल.
कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, गुजरात, पंजाब, दिल्ली, तेलंगणा आदी अनेक राज्यांमध्ये महाराष्ट्रापेक्षा खूप जास्त प्रमाणात करोना चाचण्या करण्यात येतात. जास्तीतजास्त चाचण्या वेळेत केल्यास रुग्णांचा लवकर शोध लागू शकतो तसेच त्याची जीवही वाचू शकतो, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अपर सचिव आरती आहुजा यांनी १६ सप्टेंबर रोजी पत्र लिहून कळवले आहे. महाराष्ट्रात १० लाख लोकांमागे सरकारी ४२००० चाचण्या केल्या जात आहेत. यात करोना पॉझिटिव्ह दर हा २१.५ टक्के आहे. आम्ही गेल्या आठवड्यात १० लाख लोकांमागे रोज सरासरी किती चाचण्या केल्या जातात याची माहिती घेतली असता रोज सरासरी ३७७ चाचण्या केल्या जात असल्याचे दिसून आले असून ही गंभीर बाब आहे. त्यामुळे एका महिन्यात सरासरी जास्तीत जास्त रोज किती चाचण्या झाल्या याची माहिती घेतली असता १० लाख लोकांमागे ५८३ चाचण्या घेण्यात आल्या असून यात करोना पॉझिटिव्ह रुग्णांचा दर हा २६.९ टक्के होता.
कोरोनासाठी अॅन्टिजेन चाचण्या करण्यामागे तात्काळ रुग्ण शोध घेणे, लागण झालेल्या विभागात तसेच करोना रुग्णांच्या संपर्कातील लोकांचा शोध घेऊन त्यांच्या तात्काळ तपासणीसाठी ही चाचणी योग्य असली तरी लक्षणे असलेल्या व अॅन्टिजेन चाचणी निगेटिव्ह आलेल्या लोकांची आरटीपीसीआर चाचणी करणे आवश्यक असल्याचे अपर सचिवांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. यातील महत्वाचा भाग म्हणजे अॅन्टिजेन चाचणीसाठी स्वॅब घेतानाच दोन स्वॅब घ्यावे जेणेकरून काही शंका आल्यास आरटीपीसीआर चाचणीही करता येईल व रुग्णाला पुन्हा चाचणीसाठी यावे लागणार नाही. दुर्दैवाने त्याचीही अंमलबजावणी महाराष्ट्रात होताना दिसत नाही. महाराष्ट्रात ५३९ करोना चाचणी प्रयोगशाळा असून यापैकी २१८ प्रयोगशाळेत १०० पेक्षा कमी चाचण्या केल्या जातात. याप्रयोगशाळांच्या क्षमतेचा पूर्ण वापर केला जावा. त्यासाठी पुरेसा कर्मचारी वर्ग नेमणे त्यांच्या शिफ्ट पासून योग्य व्यवस्थापन करण्यासही सांगण्यात आले आहे.