जळगाव (प्रतिनिधी) गुवाहाटीतमध्ये ठेवण्यात आलेल्या बंडखोर आमदारांमध्ये जोरदार वादावादी झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. याबाबत शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून देखील दावा करण्यात आला आहे. विशेष म्हणजे जळगाव जिल्ह्यातील दोन आमदार मंत्रीपदावरून भिडल्याची चर्चा रात्रीपासून सुरु आहे.
या बंडखोर आमदारांची कुंटुंबीय धास्तावली आहेत. तुम्ही गद्दारी केली, पैशांसाठी बंडंखोरी केली. तुम्ही गुवाहाटीला पोहोचल्याने या सर्वांमधून सुटलात. मात्र आम्ही इथे कोणत्या परिस्थितीमध्ये जगत आहोत, आमचे घराबाहेर निघणे देखील अशक्य झाले आहे, असे या आमदारांना यांच्या जवळचे लोक सांगत आहेत. त्यामुळे ते अस्वस्थ झाले असून, एकनाथ शिंदे यांनी त्यांना संयम ठेवण्याचे आवाहन केल्याचे देखील सामनाने म्हटले आहे. बंडखोरांविरोधात राज्यभरातील शिवसैनिक पेटून उठल्याने आसाममधल्या रॅडिसन ब्ल्यू हॉटेलमधील आमदारांमध्ये अस्वस्थता आहे. त्यातून त्यांचा गुवाहाटीमधील मुक्काम वाढला आहे. मात्र आता या आमदारांचा संयम सुटला असून, त्यांच्यामध्ये भांडणे सुरू झाल्याचाही दावा सामनामधून करण्यात आला आहे.
जळगावचे दोन आमदारही भिडले ?
दुसरीकडे जळगाव जिल्ह्यातील शिंदे गटात सामील झालेल्या दोन आमदार मंत्रीपदावरून भिडल्याची जोरदार चर्चा आहे. अगदी धक्का-बुक्की पर्यंत गोष्ट गेल्याचे बोलले जात आहे. शिंदे गट आणि भाजपची सत्ता आल्यास कोण मंत्री बनेल?, यारून वादावादी सुरु असल्याचे कळते. शिंदे गटास भाजपने अवघी १२ ते १४ मंत्रीपद देण्यास तयार असल्याचे वृत्त समोर आले आहे. अवघे काही मंत्रिपद शिंदे गटाच्या वाट्यास आल्यास कुणा-कुणाला खुश करता येईल, हा मोठा प्रश्न सध्या एकनाथ शिंदे यांच्यासमोर आहे. दुसरीकडे जिल्ह्यातील फुटलेल्या पाच आमदारांपैकी दोन सोडले तर तर तिघांना मंत्रीपदाचे गाजर देण्यात आले असल्याचे कळते. पण शिंदे गटाला अवघे १२ ते १४ मंत्रीपद मिळणार असल्यामुळे एकाच जिल्ह्यात एकाहून अधिक मंत्रीपद एकनाथ शिंदे यांना देता येणार नाहीत, हे स्पष्ट आहे. तूर्त एकनाथ शिंदेंकडून वादावादी करणाऱ्या आमदारांना शांततेचे आवाहन करण्यात आले आहे.