जळगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील विटनेर येथील शेतकऱ्याने कर्जाच्या विवंचनेतून विष पिऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
यासंदर्भात अधिक असे की, विटनेर (ता. जळगाव) येथील शेतकरी गोकुळ पांडुरंग वराडे (वय ४९) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. गोकुळ वराडे हे मकरसंक्रातीच्या दिवशी शेतात फवारणीसाठी गेले होते. या दरम्यान त्यांनी विषारी द्रव्य सेवन केले होते. हा प्रकार लक्षात आल्यानंतर कुटूंबियांनी त्यांना तात्काळ उपचारासाठी शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपचारादरम्यान रविवारी त्यांचा मृत्यू झाला.
वराडे त्यांच्याकडे स्वमालकीचे विटनेर शिवारात एकूण ८० आर जमिनीचे क्षेत्र आहे. त्यांनी जळके स्टेट बँक शाखेतून शेतासाठी कर्ज घेतले होते. या कर्जाच्या नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.