जळगाव (प्रतिनिधी) जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील आणखी एका जवानाला वीरमरण आलं आहे. चाळीसगाव तालुक्यातील पिंपळगाव येथील यश दिगंबर देशमुख शहीद झाले असून ते अवघे २१ वर्षांचे होते.
यश देशमुख गेल्या वर्षी प्यारा मिल्ट्रीमध्ये भरती झाला होता. गेल्या तीन महिन्यांपासून काश्मीरमध्ये त्याची नेमणूक करण्यात आली होती. यश देशमुख शहीद झाल्याचं वृत्त सैन्य दलाच्या वतीने यशच्या कुटुंबाला फोनद्वारे कळविण्यात आल्याची माहिती त्याच्या कुटुंबियांकडून देण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाकडून या घटनेला अधिकृत दुजोरा देण्यात आला आहे. शहीद यश दिगंबर देशमुख याचं पार्थिव शवविच्छेदनानंतर श्रीनगरहुन चंदीगड आणि औरंगाबाद मार्गे चाळीसगावला येणार असल्याची माहिती विभागाने कळविली आहे. काल दुपारी २ वाजता त्यांना वीरमरण आल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार वर्षभरापूर्वी यश हे सैन्यदलात भरती झाले होते. ट्रेनिंग झाल्यानंतर त्यांना जम्मू-काश्मीरमध्ये तैनात करण्यात आलं होतं. आज दुपारी शत्रूविरोधात लढा देत असताना त्यांना वीरमरण आहे. त्यांच्या निधनानंतर महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे.
यश देशमुख यांच्या मागे त्यांचे आई-वडील आणि एक भाऊ असं कुटुंब आहे. त्यांच्या शहीद होण्याची बातमी गावात कळताच सर्वत्र शोककळा पसरली. अद्याप त्यांच्या आई-वडिलांना मुलगा शहीद झाल्याचे सांगण्यात आलेले नाही. यश यांच्या निधनाच्या बातमीनंतर गावात एकही चूल पेटली नसून दहशतवाद्याच्या हल्ल्याचा सर्वांकडून निषेध केला जात आहे.