मुंबई (वृत्तसंस्था) माझा फोन टॅप होत असल्याचा संशय येत आहे. विशेष म्हणजे काही एजन्सीकडून व्हॉट्सअॅप मेसेजही टॅप करण्यात येत आहेत, असे ट्वीट राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मध्यरात्री केल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी मध्यरात्री दीड वाजता एक ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये म्हटलंय की, माझा फोन टॅप होत असल्याचा संशय येत आहे. विशेष म्हणजे काही एजन्सीकडून व्हॉट्सअॅप मेसेजही टॅप करण्यात येत आहेत, असं आव्हाड यांनी म्हटलं आहे. दरम्यान, राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात शिवसेना पक्षप्रमुख आणि विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना नेते संजय राऊत यांचे फोन टॅप केल्याचा आरोप झाला होता. संजय राऊत यांनीही भाजपचे नाव घेत थेट आरोप केला होता. तुमचे फोन टॅप होत आहेत अशी माहिती मला भाजपच्याच एका ज्येष्ठ मंत्र्यानं दिली होती, असं राऊत म्हणाले होते.