पाळधी, ता. धरणगाव (प्रतिनिधी) येथील एका तरूणीने गावातीलच तरूणासोबत प्रेम विवाह केल्यानंतर अवघ्या दोन दिवसातच तिचा संशयास्पद मृत्यू झाल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान, सासरच्या मंडळीने आपल्या मुलीचा घातपात केल्याचा आरोप माहेरच्यांनी केला आहे.
याबाबत वृत्त असे की, आरती विजय भोसले (वय १९) ही तरूणी ६ डिसेंबर २०२० पासून बेपत्ता झाली होती. दत्त जयंतीच्या दिवशी ती पाळधी गावातीलच प्रशांत पाटील या तरूणासोबत विवाह करून परतली. तिने प्रशांत सोबत प्रेम विवाह केला होता. दरम्यान, या घटनेला दोन दिवस होत नाही तोच आज सकाळी आरतीच्या आईला काही तरूणांनी त्यांच्या मुलीचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. यानुसार त्यांनी मुलीच्या सासरी जाऊन पाहणी केली असता तिचा मृतदेह संशयास्पदरीत्या आढळून आला. सासरच्या मंडळीने घातपात करून तिला मारून टाकल्याचा आरोप माहेरच्यांनी केला आहे. आरती विजय भोसले हिचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी जिल्हा रूग्णालयात आणला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. तर तसेच आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह स्वीकारणार नसल्याचा पवित्रा देखील घेतला होता.
















