धरणगाव (प्रतिनिधी) सुमारे ११ लाख रुपये घेऊन जाणाऱ्या एरंडोल तालुक्यातील फरकांडे येथील कापूस व्यापारी स्वप्नील रत्नाकर शिंपी खून प्रकरणी अटकेतील सहाही आरोपींची सोमवारी न्यायालयाने पुन्हा एकदा न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.
फरकांडे येथील कापूस व्यापारी स्वप्नील रत्नाकर शिंपी यांची कार पाळधी पेट्रोल पंपाजवळ २६ नोव्हेंबरला रात्री ८ वाजेच्या सुमारास तीन दुचाकीवर आलेल्या चौघांनी अडवत चाकूने भोसकून खून केला होता. या प्रकरणी १) नटवर किशोर जाधव (वय ३९ वर्षे रा. शिवकॉलनी, शिरुडनाका अमळनेर ता अमळनेर जि.जळगाव) २) कुणाल ऊर्फ सदाशिव वाणी (वय ४० वर्षे रा. चौगुले प्लॉट शनिपेठ, जळगाव), ३) विक्रम राजु सारवान (वय ३२ वर्षे रा. गुरु नानक नगर, शनिपेठ जळगाव) ,४) अंकुश किसन गवळी (वय ३६ वर्षे रा. गवळीवाडा, शनिपेठ, जळगाव) , ५) सनी धर्मराज पवार (वय २३ वर्षे रा. गुरुनानक नगर, शनिपेठ जळगाव), ६) अशोक जगदीश प्रजापत (वय २९ वर्षे रा.प्रजातप नगर, मुमुराबादरोड, जळगाव). या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील नटवर जाधव हा पोलीस कर्मचारी असून तोच या गुन्ह्याचा मास्टर माइंड असल्याचे पोलीस तपासात समोर आलेले आहे.
संशयित आरोपींना अटक केल्यानंतर पोलिसांनी सर्व आरोपींची पोलीस कोठडीचा अधिकार राखून ठेवत न्यायलयीन कोठडीची विनंती कोर्टाकडे केली होती. त्यानुसार कोर्टाने १३ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर सोमवारी (६ डिसेंबर) रोजी सहाही आरोपींची ओळख परेड झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ मंगळवारी सर्व आरोपींना कोर्टात हजर करत ७ दिवसांची पोलीस कोठडी मागितली. त्यावर न्यायालयाने न्यायालयाने १३ डिसेंबरपर्यंत अशी ६ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. काल १३ डिसेंबर रोजी पोलिसांनी सहाही आरोपींना न्यायालयात हजर केले. यावेळी पोलिसांनी पुन्हा न्यायालयीन कोठडीची मागणी केली. त्यानुसार सर्व आरोपींची २२ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.
















