जळगाव (प्रतिनिधी) शहरातील ‘सागर पार्क’ बाबत सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे. त्यामुळे तो विषय काढून ‘बीएचआर’ घोटाळ्यावरून लक्ष विचलित करण्यापेक्षा हिंमत असेल तर ‘वॉटरग्रेस’वर कारवाई करून दाखवा, असे आव्हान सामाजिक कार्यकर्ते अॅड. विजय पाटील यांनी आमदार राजुमामा भोळे यांनी दिले आहे.
वॉटरग्रेस प्रकरणी आमदार गिरीश महाजन यांचे प्रसार माध्यमांमध्ये नाव घेतले जात असल्याबद्दल आज भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेत आमदार राजूमामा भोळे यांनी शहरातील सागरपार्कची जागा हडप करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारतर्फे १०० कोटी रूपयांची सुपारी देण्यात आल्याचा खळबळजनक आरोप केला होता. यावर सामाजिक कार्यकर्ते अॅड. विजय पाटील राजू मामा यांना आव्हान दिले आहे की, महापालिकेत तुमची सत्ता आहे. त्यामुळे पुढील तीन दिवसात विशेष सभा बोलावून ‘वॉटरग्रेस’वर कारवाई करून तिला ब्लॅक लिस्टमध्ये टाका. शहरातील ‘सागर पार्क’ बाबत सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे. त्यामुळे तेथे काहीच होऊ शकत नाही. राजू मामा भोळे यांच्यावर ‘वॉटरग्रेस’ बाबत सध्याच्या परिस्थितीत कुणीही आरोप केलेले नाहीत. आरोप गिरीश महाजन यांच्यावर आहेत, ते खुलासे करतील. त्यामुळे अचानक राजूमामा भोळे यांनी याप्रकरणात उडी घेण्याचे कारण काय?. राजूमामा कदाचित ‘वॉटरग्रेस’मध्ये स्लीपिंग पार्टनर असतील, असा टोला देखील अॅड. विजय पाटील यांनी ‘द क्लिअर न्यूज’सोबत बोलतांना लगावला आहे.