छत्रपती संभाजीनगर (वृत्तसंस्था) विहिरीतील दगड माती वाहून नेणारी वाहने पकडून ती सोडण्यासाठी दहा हजार रुपयांची मागणी करत तडजोडी करुन चार हजार रुपयाची लाच स्वीकारताना तलाठी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला. जितेंद्र विलास राठोड (रा. जीवनज्योती अपार्टमेंट, छत्रपती संभाजीनगर) असे तलाठ्याचे नाव असून शनिवारी रात्री बिडकीन पोलिस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
शेकटा (ता.पैठण) येथील एका शेतकऱ्याच्या काकाच्या शेतातील विहिरीचे खोदकाम करण्यात आले होते. विहिरीतील दगड माती वाहून नेण्यासाठी वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती. दगड माती वाहतूक केली जात असल्याची माहिती तलाठी जितेंद्र विलास राठोड यास मिळाली. राठोड यांनी रस्त्यात वाहने अडवली वाहनांवर कारवाई न करण्यासाठी शेतकऱ्याला दहा हजार रुपयांची मागणी केली. पंधरा दिवसांपूर्वी शेतकऱ्याने तलाठ्याला पाच हजार रुपये दिले मात्र तलाठ्याने आणखी पाच हजार रुपयाची मागणी केली. शेतकऱ्याला पैसे देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाला या संदर्भातील तक्रार केली.
शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ३० डिसेंबर रोजी बिडकीन परिसरात सापळा रचला. मात्र, तक्रारदारासोबत पंच गेल्याने राठोडने अधिक प्रश्न विचारले. त्याचे उत्तर देताना तक्रारदार गडबडला व संशय येताच राठोडने पैसे घेण्यास नकार दिला. मात्र, तो निघून जाण्याआधीच फुला यांच्यासह अंमलदार राजेंद्र सिनकर, रवींद्र काळे, शिरीष वाघ, चांगदेव बागूल यांनी त्याला ताब्यात घेतले. या प्रकरणी तलाठ्याला ताब्यात घेऊन बिडकीन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.