जयपूर (वृत्तसंस्था) शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देताना सचिन पायलट यांनी नाव न घेता राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर आणि भाजपावर सडकून टीका केली. ते म्हणाले, “जर तुम्ही शेतकऱ्याच्या कल्याणाची भाषा करत असाल तर तो खरा राष्ट्रवाद आहे. नागपूरमधून हाफ चड्डी घालून खोटी भाषणं देणं हा राष्ट्रवाद नव्हे.” भाजपा शेतकऱ्यांचं भविष्य अंधारात ढकलत आहे असा आरोप सचिन पायलट यांनी केला. जयपूर येथे शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ आयोजित सभेत ते बोलत होते.
भाजपावर टीका करताना पायलट म्हणाले, “आत्ताच्या काळात तुम्ही ‘लव्ह जिहाद’ या विषयावर बोलता. विवाहासंबंधी कायदे करत आहात आणि दुसरीकडे शेतकऱ्यांचं भविष्य अंधारात ढकलत आहात. इतिहास साक्षी आहे, देशात बहुतेक शेतकरी नेते हे काँग्रेस पक्षाचे होते. तर काही मोजकेच इतर पक्षाचे होते. भाजपामध्ये तर एकही शेतकरी नेता नाही आणि होऊही शकणार नाही. मला याचं वाईट वाटतं की सध्या देशातील शेतकरी केवळ आंदोलनच करत नाहीत तर त्यांच्या मनात भीती देखील आहे. त्यांच्या आणि त्यांच्या मुलांच्या भविष्याची त्यांना चिंता आहे.”
केंद्रावर टीका करताना पायलट म्हणाले, “जे शेतकरी आपल्या हक्कांसाठी दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करत आहेत त्यांना नक्षलवादी, माओवादी, विभाजनवादी आणि दहशतवादी संबोधलं जात आहे. ही संबोधनं केली जात आहेत कारण शेतकऱ्यांचा एकही नेता केंद्र सरकारमध्ये नाही, जो शेतकऱ्यांच्या कल्याणाबाबत विचार करेल. जर शेतकऱ्यांसोबत उभं राहणं हे राजकारण असेल तर आम्ही ते करत आहोत. आमचा शेतकऱ्यांना पाठिंबा आहे आणि कायम पाठिंबा राहिल.
“शेतकऱ्यांच्या कल्याणाबाबत बोलणं हा खरा राष्ट्रवाद आहे. नागपूरमधून हाफ चड्डी घालून खोटी भाषणं देणं हा राष्ट्रवाद नव्हे,” अशा तिखट शब्दांत राजस्थानचे काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर आणि भाजपावर टीका केली.