मुंबई (वृत्तसंस्था) सध्या एका जाहिरातीमुळे तनिष्क ज्वेलरी कंपनी वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. तनिष्कच्या त्या जाहिरातीमध्ये हिंदू-मुस्लिम एकता दाखवणाचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र तनिष्कने प्रदर्शित केलेली जाहीरात ही लव जिहादला प्रोत्साहन देणारी असल्याचा दावा काहींनी केला. त्यानंतर ट्विटरवर #BoycottTanishq चा ट्रेंड सुरु झाला. त्यानंतर आज गुजरातमध्ये ‘तनिष्क’च्या ज्या शोरूमवर हल्ला झाला, तिथल्या मॅनेजरला जमावाला माफीनामा लिहून द्यावा लागला. त्यानंतर तिथला जमाव शांत झाला.
ही जाहीरात प्रदर्शित करुन, हिंदूंच्या भावना दुखावल्याबद्दल कच्छ जिल्ह्यातील जनतेची माफी मागतो” असे मॅनेजरने त्या माफीनाम्यात म्हटले आहे. गुजरातच्या गांधीधामधमली ‘तनिष्क’च्या शोरूमवर हा हल्ला करण्यात आला, असे सूत्रांनी सांगितले.
काय होती ही जाहीरात ?
हिंदू सुनेचे डोहाळजेवण तिचे मुस्लीम सासू-सासरे करीत असल्याचे दाखविणारी ही जाहिरात ‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहन देणारी असल्याचा आरोप अत्यंत तीव्रतेने झाल्याने ‘तनिष्क’ने आपली जाहिरात मागे घेतली.‘एकत्वम’ या नावाने गेल्या आठवडय़ामध्ये यू-टय़ुब या माध्यमाद्वारे ४५ सेकंदाची ही जाहिरात प्रसारित झाली. मुस्लीम सासू सासऱ्यांकडून मुलीसारखे प्रेम मिळणाऱ्या हिंदूू सुनेच्या डोहाळजेवणाच्या सोहळ्याविषयी सांगणाऱ्या जाहिरातीत या कुटुंबात दोन भिन्न धर्म, संस्कृती, परंपरांचे मीलन झाल्याचे मांडण्यात आले होते.