सिडनी (वृत्तसंस्था) सिडनीतल्या पहिल्याच वन डेत यजमान ऑस्ट्रेलियानं टीम इंडियाचा ६६ धावांनी पराभव केला. ऑस्ट्रेलियानं दिलेल्या ३७५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडियाला ५० षटकात आठ बाद ३०८ धावांचीच मजल मारता आली. भारताकडून हार्दिक पंड्यानं ९० आणि धवननं ७४ धावांची खेळी करुन विजयासाठी संघर्ष केला. त्या दोघांनी पाचव्या विकेटसाठी १२८ धावांची भागीदारी रचली.
जोश हेझलवूड आणि अॅडम झॅम्पाच्या प्रभावी माऱ्यासमोर त्यांचे प्रयत्न अपुरे ठरले. झॅम्पानं 4 तर हेझलवूडनं 3 फलंदाजांना माघारी धाडलं. ऑस्ट्रेलियाने विजयासाठी दिलेल्या ३७५ धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात आश्वासक झाली. शिखर धवन आणि मयांक अग्रवाल यांनी पहिल्या विकेटसाठी ५३ धावांची भागीदारी केली. हेजलवूडने अग्रवालला माघारी धाडत टीम इंडियाला पहिला धक्का दिला, त्याने २२ धावा केल्या. यानंतर कर्णधार विराट कोहली आणि श्रेयस अय्यरही ठराविक अंतराने माघारी परतले. एका क्षणाला टीम इंडियाची अवस्था ३ बाद ८० अशी होती. यानंतर भरवशाच्या लोकेश राहुलनेही निराशा करत माघारी परतण पसंत केलं. ४ बाद १०१ अशा संकटात सापडलेल्या टीम इंडियाला अखेरीस शिखर धवन आणि हार्दिक पांड्या यांनी सावरलं. दोन्हबी फलंदाजांनी पाचव्या विकेटसाठी १२९ धावांची भागीदारी केली. शिखर आणि हार्दिक पांड्या भागीदारी करत असताना टीम इंडियाच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. परंतू फिरकीपटू झॅम्पाने टीम इंडियाची जमलेली जोडी फोडत ऑस्ट्रेलियाला पुन्हा पुनरागमन करुन दिलं. ७४ धावांची खेळी करत धवन बाद झाला. यानंतर हार्दिक पांड्याने फटकेबाजी करत सामन्यात रंगत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. परंतू झॅम्पाच्या गोलंदाजीवर उंच फटका खेळताना तो देखील सीमारेषेवर स्टार्ककडे झेल देऊन माघारी परतला. पांड्याने ९० धावांची खेळी केली. यानंतर भारताच्या अखेरच्याा फळीतल्या फलंदाजांनी निराशाच केली. ऑस्ट्रेलियाकडून फिरकीपटू झॅम्पाने ४ तर हेजलवूडने ३ तर मिचेल स्टार्कने १ बळी घेतला.
त्याआधी, कर्णधार फिंच आणि स्टिव्ह स्मिथ यांची धडाकेबाज शतकं आणि त्यांना डेव्हिड वॉर्नर आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी फटकेबाजी करत दिलेली उत्तम साथ या जोरावर ऑस्ट्रेलियाने पहिल्या वन-डे सामन्यात ३७४ धावांपर्यंत मजल मारली . आयपीएल गाजवणाऱ्या भारतीय गोलंदाजांनी पहिल्याच सामन्यात निराशाजनक कामगिरी केली. क्षेत्ररक्षणादरम्यान भारतीय खेळाडूंनी केलेल्या गलथान कामगिरीचा फायदा ऑस्ट्रेलियाला मिळाला. फिंचने ११४ तर स्मिथने १०५ धावांची खेळी केली. स्मिथ आणि फिंचनंतर मॅक्सवेलनंही १९ चेंडूत ४५ धावा कुटल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला भारताविरुद्ध विक्रमी धावसंख्या उभारता आली. सिडनीतली सहा बाद ३७४ ही धावसंख्या ही ऑस्ट्रेलियाची भारताविरुद्ध उभारलेली वन डेतली सर्वात मोठी धावसंख्या ठरली.