नांदेड (वृत्तसंस्था) मुखेड तालुक्यातील पांखडेवाडी येथील सार्वजनिक पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीतील विद्युत पंप (मोटार) काढण्यासाठी गेलेल्या युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी (दि. २६) सकाळी नऊ वाजताच्या सुमारास घडली. सदर तरुणाचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यासाठी ग्रामस्थांना आठ तास शर्थीचे प्रयत्न करावे लागले.
नव्यानेच प्रस्थापित झालेल्या ग्रामपंचायच्या सार्वजनिक पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीतील अडकलेल्या विद्युत पंप (मोटार ) बाहेर काढण्यासाठी गावातील गणेश शिवलिंग वारे, मारोती विश्वनाथ दंते, सुमीत राजेंद्र सोनटक्के, मारोती विश्वनाथ बेबळगे हे चार युवक विहिरीत उतरले होते. यापैकी गणेश शिवलिंग वारे (२२) या युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. सदर युवकास ग्रामस्थांनी शोधण्याचा प्रयत्न केला परंतु मृतदेह सापडला नाही.
मुखेड येथील बचाव पथकातील संजय बालाजी अडगुलवाड, सायदुराम देविदास मामीलवाड, माधव नागा अडगुलवाड यांनी शर्थीचे प्रयत्न करुन सायंकाळी चारच्या सुमारास गणेशचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. मयत गणेश वारे यांच्या पश्चात आई, वडिल, भाऊ, २ बहिणी असा परिवार आहे. या प्रकरणी मुखेड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
















