जळगाव (प्रतिनिधी) एमआयडीसीतील व्ही-सेक्टरमधील मुकेश ॲग्रो इंडस्ट्रीज या दालमिल कंपनीत काम करताना महिला मजुराचा स्कार्फ मशीनच्या पट्ट्यात अडकल्याने गळफास लागून मुंडके धडापासून वेगळे झाल्याची भयंकर दुर्घटना मंगळवारी १२ मार्च दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली.सरस्वती गोविंदा ठाकरे उर्फ सरस्वती वीरेंद्रसिंग मोरया (वय-३५, रा.सुहागी ता.खालवा जि.खंडवा ह.मु. जळगाव), असे मयत महिला मजूराचे नाव आहे.
सरस्वती गोविंदा ठाकरे उर्फ सरस्वती वीरेंद्रसिंग मोरया या विवाहिता आपले पती गोविंदा नानू ठाकरे आणि तीन मुलांसह एमआयडीसीतील व्ही सेक्टरमध्ये मुकेश ऍग्रो इंडस्ट्रीज या दालमिल कंपनीत गेल्या दोन वर्षांपासून काम करत असून तेथेच वास्तव्याला होत्या. नेहमीप्रमाणे मंगळवारी १२ मार्च रोजी दुपारी २ वाजता जेवण झाल्यानंतर महिला मजूर सरस्वती ठाकरे या कंपनीत कामावर हजर झाल्या. त्यावेळी मशीनमध्ये डाळ टाकत असताना त्यांच्या गळ्यात बांधलेला स्कार्फ हा मशीनच्या पट्ट्यात अडकला. त्यामुळे त्यांना गळ्याला फास बसला. हा फास एवढा घट्ट होता की, महिलेचे मुंडकेच धडापासून वेगळे झाले. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना झाल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. या घटनेची माहिती एमआयडीसी पोलिसांना कळविण्यात आली.
एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पीएसआय रविंद्र गिरासे, बीट हवालदार ललित नारखेडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाचा पंचनामा केला. त्यांचे पार्थिव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले आहे. मयत महिलेच्या पश्चात पती दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.