नाशिक (वृत्तसंस्था) नाशिक पश्चिम मतदारसंघातील काही मतदान केंद्रांवरील जवळपास सात मतदान यंत्रे बदलण्यात आल्याचा आरोप करीत, यामागील कारण काय आणि उमेदवार व त्याच्या प्रतिनिधींना त्याविषयी माहिती का दिली गेली नाही, असा सवाल नाशिक पश्चिमचे महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार सुधाकर बडगुजर यांनी उपस्थित केला आहे.
बडगुजर यांनी शुक्रवारी माध्यमांशी संवाद साधत आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, कोणत्याही मतदान केंद्रावरील व्हीव्हीपॅट, बॅलेट युनिट व कंट्रोल युनिट ही मतदान यंत्रे बदली करावयाची असल्यास त्याविषयी संबंधित सर्वच उमेदवारांना, तसेच त्यांच्या प्रतिनिधींना माहिती कळवायची असते. कारण उमेदवार हा निवडणूक प्रक्रियेतील एक महत्त्वाचा घटक असतो. मात्र नाशिक पश्चिममधील काही मतदान केंद्रांवरील मतदान यंत्रांचा बदल करताना त्याविषयी कोणत्याही स्वरूपाची माहिती आम्हाला दिली गेली नाही, असा आरोप बडगुजर यांनी केला आहे.
बूथ क्रमांक २२१, ३२९, १७४, ०६, १९१, २६९, ३०६ येथील व्हीव्हीपॅट युनिट, बॅलेट युनिट व कंट्रोल युनिट बदलण्यात येऊन राखीव असलेली मतदान यंत्रे रिप्लेस करण्यात आली. मात्र याविषयी मतदानावेळी कोणत्या कारणास्तव यंत्रे बदलली याची माहिती उमेदवार अथवा त्यांच्या प्रतिनिधींना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली नसल्याचे बडगुजर यांनी स्पष्ट केले. याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी, तसेच जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे लेखी स्वरूपात तक्रार करण्यात आली असून, त्यांनी त्याविषयी स्पष्टता करावी, अशी मागणी बडगुजर यांच्यासह ठाकरे गटाचे सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, महानगरप्रमुख विलास शिंदे, माजी नगरसेवक संतोष गायकवाड यांनी केली.
फॉर्म क्रमांक १७ सी मध्ये व्हीव्हीपॅट, बॅलेट व कंट्रोल युनिटची माहिती नमूद केलेली असते. याच १७ सी मध्ये उल्लेख असलेले म्हणजे डिक्लेअर केलेले व रिझर्व्ह असलेल्या मतदान यंत्रांच्या माहितीवरून आपणास मतदान यंत्रे बदलण्यात आल्याची माहिती समजली असून, त्यावरूनच संशय निर्माण होत असल्याचा खुलासा बडगुजर यांनी केला आहे. दरम्यान, मतदान यंत्र बदलाविषयी योग्य खुलासावजा स्पष्टता प्रशासनाकडून केली जात नाही, तोपर्यंत निवडणूक आयोगाने मतमोजणी करू नये, अशी भूमिका देखील बडगुजर यांनी मांडली आहे. निवडणूक आयोग याबाबत काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागून आहे.