धरणगाव (प्रतिनिधी) धरणगाव पोलीस स्टेशन येथील पोलीस नाईक विलास बुधा सोनवणेने तक्रारदारकडे १९ हजार रुपयांची लाच मागितली होती. तेव्हापासून आरोपी विलास सोनवणे हा फरार होता. दरम्यान, आज लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पथकाने आरोपीला अटक केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांचे विरुद्ध धरणगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्यामध्ये फिर्यादी यांना शिक्षा होणार नाही व शिक्षेपासून बचाव होईल, अशा पद्धतीने कागदपत्रात मदत करून न्यायालयात चार्जशीट पाठविण्याच्या मोबदल्यात आलोसे यांनी तक्रारदार यांच्याकडून १९ हजार रुपयांची लाचेची मागणी केली. त्यावर सदर आरोपी विलास बुधा सोनवणे (वय ४४, व्यवसाय नोकरी, पोलीस नाईक बक्कल धरणगाव पोलीस स्टेशन रा. अमळनेर) जळगाव पोलीस विभाग वर्ग -३ यांच्यावर अमळनेर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाल्यापासून आजपावेतो सदर आरोपी फरार होता. आज जळगाव अॅन्टी करप्शन ब्युरो युनिटमधील पोहेकॉ दिनेशसिंग पाटील यांना सदर आरोपी जळगाव शहरातील बहिणाबाई उद्यान परीसरात असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने अॅन्टी करप्शन ब्युरो पथकाने त्यांना ताब्यात घेऊन अटक केली. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक निलेश लोधी हे करीत आहेत.