भडगाव (प्रतिनिधी) शहरातील एक बंद घराचे कुलूप तोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका आरोपीला नागरीकांच्या मदतीने पोलिसांनी अटक केली आहे. हा आरोपी सराईत गुन्हेगार असून त्याला न्यायालयात हजर केले असता सोमवारपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.
शहरातील भवानी बाग परिसरातील रामकृष्ण नगरमधील रहिवाशी आत्माराम चिंधा पाटील हे आपल्या कुटुंबासह बाहेरगावी गेले होते. त्यांच्या घराचे कुलूप बंद असताना, प्रविण संभाजी पाटील (वय ३५, रा. बाम्हणे, ता. एरंडोल) आणि विभोर जुलाल जाधव (रा. हिगोणे, जवखेडे, ता. एरंडोल) या दोघांनी १७ जानेवारी रोजी रात्री ३.१० वाजता घराचे कुलूप तोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला.
यावेळी, संदीप भास्कर मराठे (मुंगटीकर), हे घरासमोरील आपल्या घरात होते आणि त्यांचे लक्ष या प्रकारावर गेले. त्यांनी त्वरित कॉलनीतील इतर रहिवाशांना जागृत करून या घटनेची माहिती दिली. चोरट्यांनी घरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत असताना, त्यांनी आवाज ऐकून तिथून आपल्या काळ्या रंगाच्या होन्डा शाहिन मोटारसायकल (क्र. एम. एच. १९ डी.ए. ८३८६) घेऊन पेठ चौफुलीकडे पळ काढला.
संदीप मराठे यांनी आपल्या काही मित्रांना आणि पोलिस स्टेशनला माहिती दिली. यावर पीएसआय किशोर पाटील, एएसआय राजेंद्र पाटील, संदीप मराठे आणि हर्षल लालसिंग पाटील यांनी चोरट्यांचा पाठलाग सुरू केला. त्यात, प्रविण संभाजी पाटील यास पेठ चौफुलीवर पकडण्यात यश आले, तर दुसरा आरोपी, विभोर जुलाल जाधव, पळून जाण्यात यशस्वी झाला.