डोंबिवली (वृत्तसंस्था) पावसामुळे अडकून पडलेल्या लोकलमधून उतरून रेल्वे स्थानकाच्या दिशेने चालणाऱ्या आजोबांच्या हातातून निसटलेले अवघ्या चार महिन्यांचे बाळ नाल्यात वाहून गेल्याची धक्कादायक घटना ठाकुर्ली – कल्याण स्थानकादरम्यान घडली. यावेळी आईचा काळीज चिरणारा आक्रोश बघून अनेकांचे डोळे पाणावले होते.
बाळ वाहून गेल्याने सोबत असलेली आई हवालदिल झाली. बाळाला वाचवण्यासाठी तिने टाहो फोडला. मात्र नाल्यातील वेगवान प्रवाहामुळे कुणीही तिला मदत करू शकले नाही. मूळची हैदराबादची असलेली योगीता रुमाले भिवंडीजवळील धामणगाव परिसरात राहणाऱ्या आपल्या आईवडिलांकडे सहा महिन्यांपूर्वी प्रसूतीसाठी आली होती. योगीता यांची मुलगी रिषिका हिच्यावर जन्मापासूनच मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू असल्यामुळे, मुलीच्या जन्मानंतरही गेल्या सहा महिन्यांपासून ती आपल्या वडिलांकडेच राहत होती.
नेहमीप्रमाणे योगीता वडिलांसमवेत बुधवारी सकाळी मुलीला घेऊन तपासणीसाठी मुंबईतील रुग्णालयात गेली होती. दुपारी ती अंबरनाथ लोकलने परत निघाली. मात्र याचदरम्यान कल्याणपुढील रेल्वे मार्गावर पाणी साचल्याने सगळ्याच लोकल खोळंबल्या होत्या. त्यामुळे अनेक प्रवाशांनी ट्रॅकमध्ये उतरून चालत जाण्याचा पर्याय निवडला.
योगीता देखील वडिलांसमवेत ट्रॅकमधून चालत येत होती. चिमुरड्या रिषिकाला आजोबांनी छातीशी धरले होते. मात्र पुढे उभी असलेली लोकल नाल्याच्या अगदी जवळ उभी असल्याने प्रवाशांना या लोकलच्या बाजूला असलेल्या अरुंद पाइपलाइनवरून चालावे लागत होते. या अरुंद वाटेवरून चालताना अचानक आजोबांचा पाय अडखळला आणि त्यांच्या हातातील चिमुरडी निसटून थेट नाल्यात पडली. यामुळं त्या मातेवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तिचा आक्रोश काळीज पिळवटून टाकत होता.