जळगाव (प्रतिनिधी) गर्दीचा फायदा घेवून विवाहितेची मंगलपोत लंपास करून पळ काढणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांना दोन होमगार्ड कर्मचार्यांसह जिल्हापेठ पोलिसांनी अर्धातासातच पाठलाग करुन पकडले. ही घटना आज सकाळी शहरातील नवीन बसस्थानकात घडली.
विटनेर येथील शुभांगी राहूल ठोंबरे (वय-२५) या त्यांचा भाऊ गोलू विरभान एरंडे (वय २०, रा. मोंढाळे ता.पाचोरा) याच्यासोबत जळगाव शहरातील हरिविठ्ठल येथे मामाकडे आल्या होत्या. शुभांगी या माहेरी मोंढाळे येथे जाण्यासाठी बसने जाण्यासाठी नवीन बसस्थानकात आल्या. ११.३० वाजेच्या सुमारास जळगाव-पाचोरा बस लागल्याने विवाहिता भावासोबत बसमध्ये चढत असतांना दोन अल्पवयीन (अंदाजे वय -८ आणि ५) मुलांनी विवाहितेच्या गळ्यातील ५ ग्रॅम सोन्याचे मंगलपोत लांबविले. यावेळी बसस्थानकात गस्त असलेले होमगार्ड पुरूषोत्तम पाटील आणि सुनिल शिरसाठ यांनी तात्काळ दोघांचा पाठलाग केला. मात्र बसस्थानकाच्या मागील तुटलेल्या भितींवरुन दोघे पसार झाले. होमगार्डने हा प्रकार जिल्हापेठ पोलीस ठाण्यात कळविला. त्यानुसार जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल सतिष करनकाळ यांनी बसस्थानक गाठले. तसेच दोन्ही होमगार्ड यांच्यासोबत दुचाकीवरुन संबंधित मुलांचा बसस्थानकाच्या मागील बाजूस शोध घेतला. पोलिसांना पहाताच अल्पवयीन मुलांनी गल्लोगल्ली पळ काढला. गल्लोगल्लीच्या रस्त्यावर पाठलाग करुन अर्धातासानंतर पोलिसांनी दोघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले.