नांदेड (वृत्तसंस्था) जिल्ह्यातील हिमायतनगर येथील बहिणीला भेटून दुचाकीने गावाकडे परतणाऱ्या भावाचा ट्रकच्या मागील टायरखाली येऊन मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. २६) रात्री भोकर शहरातील उड्डाणपुलावर घडली. मंगळवारी बहिण भावाची भेट शेवटची ठरली. ट्रकने दुचाकीला जोराची धडक दिली. त्यामुळे दुचाकीस्वार ट्रकच्या पाठीमागील टायर खाली येऊन त्याचा जागीच – मृत्यू झाला. या अपघातात – मृत झालेल्या तरुणाचे नाव पुरभाजी बालाजी राजेगोरे (वय ३४, रा. शेलगाव, ता. अर्धापूर जि.नांदेड) असे आहे.
या अपघाताबाबत पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहीतीनुसार, शेलगाव (ता. अर्धापूर) येथील ३४ वर्षीय तरूण पुरभाजी बालाजी राजेगोरे हा मंगळवार दि. २६ नोव्हेंबर रोजी हिमायतनगर येथील बहिणीला भेटून रात्री गावाकडे परत जात होता. त्यावेळी भोकर शहरातील रेल्वे उड्डाणपुलावर ट्रकने (क्र. एमएच ४० सीडी ३४३१) दुचाकीला (क्र. एमएच २६ बीवाय ३८६८) जोराची धडक दिली. त्यामुळे ट्रकच्या पाठीमागील टायर खाली येऊन दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. मयताची ओळख रात्री उशिरा पटली. पोलिस निरीक्षक अजित कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार सोनाजी कानगुले पुढील तपास करीत आहेत.
शहराच्या बाहेरून बायपास वळण रस्ता असतानाही अनेक जड वाहने शहरातील उड्डाणपुलावरून जात असल्याने उड्डाण पुलावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे. मयत तरुणाच्या पश्चात आई, एक भाऊ, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. मयत तरुणांच्या वडिलांचे लहानपणीच छत्र हरवले होते. घरचा कर्ता तरुण गेल्याने कुंटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.