धरणगाव (प्रतिनिधी) बैलगाडीने नाल्यातून घरी जात असताना आलेल्या पाण्याच्या लोंढ्यामुळे दांपत्य वाहून गेल्याची घटना तालुक्यातील निंभोरा येथे आज सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास घडली. यात विवाहित बचावली असून त्यांचे पती बैलगाडीसह वाहून गेल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान या घटनेची माहिती धरणगावचे नायब तहसीलदार यांना मिळताच ते घटनास्थळी रवाना झाले आहे.
याबाबत माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील निंभोरा येथील रहिवासी भागवत भिका पाटील व त्यांची पत्नी मालुबाई भागवत पाटील हे आज सकाळी बैलगाडी घेऊन शेतात गेले होते. दुपारी पाऊस झाल्यामुळे ते बैलगाडीने घरी परत निघाले. निंभोरा व खामखेडा शिवारात असलेल्या खैरे नाल्यातून बैलगाडीने येत असताना अचानकपणे नाल्यात पाण्याचा लोंढा आल्याने बैलगाडीसह पती-पत्नी लोंढ्यात वाहून गेले. यात मालुबाई पाटील ह्या काटेरी झुडपात अडकल्याने त्यांना काही नागरिकांनी बाहेर काढले, परंतु त्यांचे पती भागवत पाटील हे बैलगाडीसह लोंढ्यात बेपत्ता झाले. त्यांचा शोध सुरू झाला आहे.