धरणगाव (प्रतिनिधी) ज्या युगात मुलाचे लग्न झाल्यानंतर आई वडील हे त्यांना ओझे वाटतात. अगदी ते म्हातारपणात आई वडिलांना सोडून राहतात. त्याच युगात आपल्या स्व. वडिलांनी अनेक वर्षापूर्वी मानलेले मारोती रायाचे वाहन बोली लावून विकत घेण्याचे वचन मुलांनी पूर्ण केल्याची घटनेची संपूर्ण धरणगावात चर्चा आहे. यामुळेच धरणगावात यंदाच्या मारोतीच्या वहनाची विशेष चर्चा सुरु आहे.
शहरातील जागृत देवस्थान श्री बालाजी महाराज यांच्या कृपेने गावात गतवैभव प्राप्त झालेले आहे. धरणगाव पंचकृषितील बालाजी वहनोत्सव म्हणजे भाविक भक्तासाठी मोठे तीर्थस्थान याची प्रचिती पूर्वापार पासून सुरू आहे. संपूर्ण वाहनोत्सवात मारोतीच्या वहनाला विशेष महत्व प्राप्त आहे. या प्रसंगी मानलेला नवस पूर्ण होतोच, असे भविकांचे अनुभव आहेत. म्हणूनच जांजीबुवा गल्ली मोठा माळी वाडा येथील कै.ईश्वर आत्माराम महाजन यांनी बालाजी महाराज यांना साक्षी ठेवून आपला मान मानला की, माझी ईच्छा पूर्ण झाल्यास मी मारोती रायाचे वाहन बोली लावून विकत घेईन. बालाजी महाराजांनी त्यांची ईच्छा पूर्ण केली. परंतु घरची परिस्थिती हलाखीची असल्याने ते दरवर्षी नवरात्रात मारूतीच्या वाहनात स्वतः च्या कुवतीनुसार बोली लावत. परंतु त्यांना वाहन घेणे शक्य होत नसे, असे करता करता वर्षा गणित वर्ष निघून गेले. परंतु त्यांच्याने वाहन घेणे शक्य झाले नाही.अश्यातच त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला व संपूर्ण परिवाराची जवाबदारी त्यांच्या पत्नी व लहान मुलांवर आली.
येथून पुढे त्या मातेने काबाळ कष्ट करून आपला संसार पुढे नेऊन मुलांना चांगले शिक्षण देऊन सुसंस्कृत बनविलेले व त्यांना चांगल्या नोकरीवर लावून लग्न देखील करून दिले. परंतु पतीच्या इच्छेनुसार मारोती रायाचे वाहन घेऊन मान फेडायचा आहे, हे फक्त त्या मातेला व त्यांच्या मित्र परिवार आप्तेष्ट मंडळीना माहीत होते. आता तर घरची परिस्थिती सुजलाम सुफलाम होती. अशातच त्यांचा मोठा मुलगा विजय व राहुल यास कळले की, आमचे वडील ईश्वर महाजन यांनी मारुतीचे वाहन घेण्यासाठी मान मानला होता. पंरतु घरच्या हलाखीच्या परिस्थिती मुळे ते त्यांचा मान पूर्ण करू शकले नाही.हे लक्षात येताच त्यांनी यावर्षी वाहनांच्या लिलावात भाग घेऊन 1,52,000 (एक लाख बावन्न हजार रुपयांची) सर्वाधिक बोली लावून स्व. ईश्वर महाजन यांनी मानलेला मान त्यांचा मुलगा विजय महाजन व राहुल महाजन यांनी कित्येक वर्षांनंतर पूर्ण केला. या युगात मुलाचे लग्न झाल्यानंतर आई वडील हे त्यांना ओझे वाटतात व ते म्हातारपणात आई वडिलांना सोडून राहतात. आपण आज काय खाल्लं हे देखील आपल्याला उद्या सांगता येत नाही. तरी सुद्धा या मुलाने आपली परिस्थिती बदलल्यानंतर स्वतःच्या मयत वडिलांची ईच्छा पूर्ण करुन त्यांच्या आत्म्यास खरी चिरशांती दिली, अशी धरणगावात चर्चा आहे.