धरणगाव (प्रतिनिधी) शिवसेना, युवासेना आणि महिला आघाडी हे आपल्या पक्षाचे तीन प्रमुख आधारस्तंभ असून या माध्यमातून शिवसैनिकांनी आपली शाखा हे सेवा केंद्र असे समजून काम करावे. सरकारच्या जनहिताच्या योजना जगापर्यंत पोहचवाव्यात. कोणत्याही लोकप्रतिनिधीच्या सक्रीय कार्यातून त्याच्या पदाची ‘पत’ दिसत असते. आणि आपली व आपल्या पक्षाची ‘पत’ वाढविण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील रहावे असे आवाहन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. तालुक्यातील वाकटुकी येथे सभामंडपाचे भूमिपुजन आणि शिवसेना, युवासेना व महिला आघाडीच्या शाखांच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ हे होते.
तालुक्यातील वाकुटुकी येथे पालकमंत्र्यांच्या हस्ते १० लाख रूपयांच्या निधीची तरतूद असणार्या सभामंडपाचे भूमिपुजन करण्यात आले. या कार्यक्रमाला शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, पंचायत समितीचे माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे, माजी उपसभापती डी. ओ. पाटील, युवा सेनेचे तालुका प्रमुख चेतन पाटील,रविंद्र चव्हाण सर, शाखा प्रमुख रामकृष्ण पाटील, सरपंच भागाबाई पाटील, उपसरपंच गोपाळ कोळी, ग्रामपंचायत सदस्य संदीप पाटील, रेखाबाई पाटील, संजीबाई पाटील, माहेश्वरी पाटील, ग्रामसेवक अनिल पाटील, उपशाखा प्रमुख पंढरीनाथ कोळी, सचिव प्रकाश पाटील, खजिनदार गुलाबराव पाटील, समाजसेवक रविंद्र पांडुरंग पाटील यांच्या सह शिवसैनिक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी पालकमंत्र्यांच्या हस्ते शिवसेना, युवासेना आणि महिला आघाडीच्या प्रत्येकी एका शाखेच्या फलकाचे अनावरण करण्यात आले.
याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, वाकटुकीसह परिसरातील विकासकामांना आता मोठ्या प्रमाणात गती मिळाली आहे. आता गावातील सभामंडपाचे काम सुरू झालेले आहे. ग्रामस्थांनी राज्य शासनाच्या मूलभूत गरज योजनेच्या (२५/१५) अंतर्गत स्मशानभूमिपर्यंतच्या जोड रस्त्याचे कॉंक्रिटीकरण, शेतरस्ता, गावांतर्गत रस्त्यांचे कॉक्रीटीकरण आणि पेव्हींग ब्लॉक आदी कामांचे प्रस्ताव सादर करावेत. याला तातडीने मंजुरी देण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी दिली. तर शिवसेना, युवासेना आणि महिला आघाडीच्या सदस्यांनी सक्रीय पध्दतीत शासनाच्या विविध योजनांचे लाभ हे गरजूंना मिळवून देण्यासह शासनाची कामे जनतेपर्यंत पोहचवण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन रवींद्र चव्हाण यांनी केले, तर आभार ग्रामसेवक अनिल पाटील यांनी मानले.