पुणे (वृत्तसंस्था) लखनौ येथून आलेल्या प्रियकराने आयटी कंपनीत काम करणाऱ्या अभियंता प्रेयसीची पाच गोळ्या घालून निघृण हत्या केली. हा धक्कादायक प्रकार रविवारी सकाळी साडेसातच्या सुमारास हिंजवडीलगतच्या मारुजी येथील हॉटेल एलिगण्ट ओयो टाऊनहाऊसमध्ये उघडकीस आला. दरम्यान, हिंजवडी पोलिसांनी आरोपी प्रियकराला अटक केली आहे.
वंदना के. द्विवेदी (२६, रा. हिंजवडी, मूळगाव उत्तर प्रदेश) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. ऋषभ रमेश निगम (३०, रा. उत्तर प्रदेश) असे ताब्यात घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा लखनौ येथील रहिवासी आहे. आरोपी आणि वंदना यांची लखनौ येथे ओळख झाली होती. मागील काही वर्षापासून त्यांच्यात प्रेमसंबंध होते. वंदना हिंजवडीत एका आयटी कंपनीत नोकरीला होती. २५ जानेवारी रोजी रात्री पावणेदहाच्या सुमारास त्यांनी लक्ष्मी चौक, मारुंजी येथील लॉजमध्ये रूम घेतली होती. त्याठिकाणी त्यांच्यात वाद झाले. त्यानंतर रात्री उशिरा आरोपीने वंदना हिच्यावर गोळ्या झाडल्या. यामध्ये तिचा मृत्यू झाला. हल्ल्यानंतर आरोपी पळून गेला.
घटनेची माहिती मिळताच हिंजवडी पोलिसांसह गुन्हे शाखेचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मॅनेजरकडे असलेल्या मास्टर चावीने पोलिसांनी खोलीचे कुलूप उघडले. त्यावेळी वंदनाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. दरम्यान, मुंबई पोलिसांनी पळून जाणाऱ्या आरोपीला ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत. खून केल्यानंतर आरोपी अतिशय शांतपणे निघून जात असल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले आहे. आरोपी बाहेर पडल्यानंतर मुंबईच्या दिशेने निघाला.
मुंबईला जात असताना नवी मुंबई पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती मिळाली. त्यानुसार नवी मुंबई पोलिसांनी त्याला मुंबई येथून ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता, त्याने प्रेयसी वंदना हिचा खून केल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी हिंजवडी पोलिसांना कळवण्यात आल्यावर हा प्रकार उघडकीस आला. दरम्यान, संशयातून प्रियकराने हा खून केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.