जालना (वृत्तसंस्था) घनसावंगी तालुक्यातील मुरमा येथे शिवप्रसाद महादेव थुटे या तरुणाने शनिवार दि. २४ फेब्रुवारी रोजी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सकाळी उघडकीस होती. तशी चिठ्ठीही त्याच्या खिशात सापडली होती. परंतु ती चिट्ठी व गळफास दोन्ही ही बनावट असल्याची खळबळजनक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. जन्मदाता पिता महादेव त्रिंबक थुटे यांनी कौटुंबीक वादातून मुलाचा गळा आवळून खून केला. त्यानंतर मराठा आरक्षणासाठी मुलाने आत्महत्या केल्याचा बनाव केला, असल्याचे तपासात समोर आले आहे. तीर्थपुरी पोलिसांनी तब्बल ७५ दिवसानंतर या खुनाच्या गुन्ह्याचा उलगडा करत संशयित महादेव थुटे यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.
मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केल्याचा बनाव !
शिवप्रसाद महादेव थुटे या तरुणाने शनिवार दि. २४ फेब्रुवारी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. ही आत्महत्या त्याने मराठा आरक्षणासाठी केल्याची चिठ्ठीही त्याचा खिशात सापडली होती. मात्र, वैद्यकीय अहवालात त्याचा गळा दाबून खून करण्यात आल्याचे समोर आले होते. त्यानंतर पोलिसांनी तपास चक्रे फिरवली. कुटुंबांचे जबाब नोंदविले शिवप्रसाद महादेव थुटे व त्याचे वडील महादेव थुटे यांच्यात नेहमी भांडण होत असे. दि. २३ फेब्रुवारीच्या मध्यरात्री शिवप्रसाद थुटे यांनी स्वतःच्या घरातच चादरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे सांगण्यात होते. ही आत्महत्या मराठा आरक्षणामुळे केल्याचे देखील दुसऱ्या दिवशी सांगण्यात आले. यानंतर तीर्थपुरी पोलिस ठाण्यामध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. दरम्यान, सावत्र आईच्या कौटुंबिक वादातून वडिलाने आपल्या मुलाचा गळा दाबून खून केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
तब्बल ७५ दिवसानंतर खूनाचे हे प्रकरण उघड !
उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल खांबे, गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक रामेश्वर खनाळ, तीर्थपुरी ठाण्याचे पोलिस निरीक्षक साजिद अहमद यांनी महादेव थुटे व त्यांच्या पत्नीस बोलावून याबाबात चौकशी सुरू केली. सहायक निरीक्षक साजिद अहमद यांनी तपासाची चक्रे फिरवून महादेव थुटे यांची अधिक चौकशी केली. या दरम्यान महादेव थुटे यांनी आपण मुलाचा खून केल्याचे कबूल केले. याप्रकरणी सोमवारी रात्री आरोपी महादेव थुटे यास अटक केल्याची माहिती ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक साजिद अहमद यांनी दिली. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केल्याचे कारण दाखवून पित्यानेच आपल्या मुलाचा खून केल्याचे तब्बल ७५ दिवसानंतर उघड झाल्यानंतर खळबळ उडाली.
वैद्यकीय अहवालानंतर तपासाला गती !
शिवप्रसाद थुटे यांच्या प्रेताची तीर्थपुरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवाजी घुले यांनी उत्तरीय तपासणी केली होती. याचा अहवाल दि. १६ एप्रिल रोजी डॉ. शिवाजी घुले यांनी तीर्थपुरी पोलिसांना दिला. यात मृत शिवप्रसाद थुटे यांचा मृत्यू गळा दाबून झाल्याचे वैद्यकीय अहवालात स्पष्ट करण्यात आले होते. अहवालानंतर तीर्थपुरी पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता याचा तपास पोलिसांनी लावला.