बुलढाणा (वृत्तसंस्था) कोराडी धरणातील विवेकानंद स्मारक पाहण्यासाठी भानखेड ता. चिखली येथून पाच तरूण आले होते. त्यापैकी पोहण्यासाठी दोघांनी धरणात उड्या घेतल्या. त्यापैकी एकाचा धरणात बुडून मृत्यू झाला तर एकाला वाचवण्यात यश आले. ही घटना २२ जून रोजी दुपारी घडली. आदेश इंगळे (वय २०) आणि रोशन मुरारी इंगळे (२०, दोघे रा. भानखेड, ता. चिखली) अशी उडी मारलेल्या दोघांची नावे आहेत.
विवेकानंद आश्रमाने विकसित केलेल्या कोराडी प्रकल्पातील विवेकानंद स्मारक बेटाकडे प्रकल्पातील बोटीने इतर पर्यटकांसोबत भानखेडचे तरूण ज्यामध्ये ऋतिक सोनुने, अनिकेत सुरडकर, लक्ष्मण इंगळे, रोशन इंगळे व आदेश इंगळे हे जात होते. स्मारक दिसताच त्यांच्यापैकी रोशन इंगळे व आदेश इंगळे यांनी पोहण्यासाठी धरणात उडी घेतली. रोशन इंगळे व आदेश इंगळे काही वेळ पोहत होते. तोपर्यंत बोट पुढे गेली होती. परंतू थोड्याच वेळात दोघांना पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे त्यांनी वाचवा…वाचवा म्हणून आरोळ्या मारायला सुरुवात केली.
प्रसंगावधान राखत पुढे उभ्या असलेल्या गुलाब कांबळे यांनी आपली बोट सुरू केली आणि दोघांच्या दिशेने बोट वळवली. आदेशपर्यंत ही बोट आली व त्यांनी आदेशाला बोटीत घेतले. तर रोशन इंगळे पर्यंत बोट पोहचेपर्यंत तो मात्र, धरणात बुडाला. त्याचा शोध घेऊनही तो सापडला नाही. रोशन इंगळे या तरूणाचे मागच्या वर्षीच ट्रॅक्टरच्या अपघातात वडील वारले होते. त्यामुळे घराची सर्वच जबाबदारी ही रोशनवर येऊन पडली होती.
घरची परिस्थिती जेमतेम असून आई मोलमजुरी करते. घटनेची माहिती मिळताच साखरखेर्डाचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले व पट्टीच्या पोहणाऱ्यांच्या माध्यमातून त्यांनी रोशनचा शोध घेण्यास प्रारंभ केला. मात्र, सायंकाळपर्यंत त्याचा शोध लागला नव्हता. दरम्यान, बोटीत लाईफ जॅकेटची व्यवस्था करण्यात आली आहे. पण या तरुणांचे फोटो काढणे, गाणे म्हणणे सुरू होते. त्यांनी कदाचित धरणात उद्या मारल्या नसत्या तर ही घटना घडली नसती, अशी माहिती सोबत प्रवास करणाऱ्या पर्यटकांनी माध्यमांना दिली.