जळगाव (प्रतिनिधी) ज्वेलर्सच्या दुकानात तीन वर्षांपुर्वी कामाला असलेला रितेश संतोष आसेरी याने ज्वेलर्सच्या दुकानाची संपुर्ण माहिती सोनू सारवान याला दिली. त्यानुसार सोनू सारवान याने रणजीतसिंग जून्नी याच्यासाशी संपर्क साधून मास्टर प्लान तयार केल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. याच टोळीने यापुर्वी देखील शनिपेठ पोलीस ठाण्यासह धुळे येथे दरोडे टाकले असून अन्य तीन गुन्हे देखील उघडकीस आले आहे.
शहरातील सराफ बाजारातील भवानी माता मंदिरासमोर महेंद्र कोठारी यांच्या सौरभ ज्वेलर्स या दुकानावर सोमवार दि. २० मे रोजी पहाटे दुचाकीवरुन आलेल्या सहा दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकला होता. याठिकाणाहून दरोडेखोरांनी सोने, चांदीच्या दागिन्यांसह सुमारे ३२ लाख रुपयांचा ऐवज चोरुन नेला होता. दरोड्यातील मुख्य संशयित रणजितसिंग जुन्नी याला पुणे येथून ताब्यात घेण्यात आले होते. त्याने दिलेल्या माहितीवरून सागरसिंग जुन्नी, जयंतसिंग जुन्नी यांनाही या पूर्वीच अटक करण्यात आली होती. मात्र त्यांचे अन्य तीन साथीदार मात्र फरार होते. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने भुसावळ येथून शनिवारी दरोड्याचा मास्टर प्लान तयार करणाऱ्या सोनू सारवान, रितेश संतोष आसेरी व दीपक भक्तराज गोयल यांना अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता, त्यांना दि. २८ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. टोळीला सोबत घेत टाकला दरोडा तीन वर्षांपुर्वी रितेश आसेरी हा सौरभ ज्वेलर्समध्ये कामाल होता. त्यामुळे त्याला दुकानातील सर्व विभागांची संपुर्ण माहिती होती. त्याने दिलेल्या माहितीनुसार दरोड्याचा मास्टरमांईड सोनू सारवान याने दरोड्याचा मास्टर प्लान तयार केला. त्यानंतर दरोडा टाकण्यासाठी जून्नी भावंडांना सोबत घेवून त्यांनी सशस्त्र दरोडा टाकल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे.
ओळखीतून सुरु झाले चोरीचे सत्र
कोरोना काळात रितेष हा जिल्हा रुग्णालयात कामाला होता. त्याची या गुन्ह्यातील मास्टरमांईड सोनू सारवानशी ओळख झाली. तेथून घरफोडी, दरोडा असे सत्र सुरू झाले. अटकेतील सहापैकी चार जणांवर या पूर्वीच वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. यामध्ये सोनू सारवानवर नऊ गुन्हे, रणजितसिंगवर आठ, सागरसिंग व जयंतसिंग याच्यावर प्रत्येकी चार गुन्हे दाखल आहेत.
टोळीकडून अनेक दरोड्याचे गुन्हे उघडकीस
ज्वेलर्सवरील दरोडाप्रकरणात अटक करण्यात आलेल्या दरोडेखोरांच्या टोळीने यापुर्वी देखील शनिपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतच बंगाली कारागिराकडे टाकण्यात आलेला दरोडा याच दरोडेखोरांनी टाकला होता तर इतर दोन घरफोड्या केल्याची कबुली दिली. तसेच धुळे येथे १ कोटी २५ लाख रुपयांच्या दरोड्यातही यांचा समावेश असल्याचे तपासात उघड झाले असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित यांनी दिली.