धरणगाव (प्रतिनिधी) येथील गुड शेपर्ड इंग्लिश मिडियम स्कुल मधील इयत्ता ८ वी चा विद्यार्थीं प्रणित भाटीया याची इस्रो च्या सहलीसाठी निवड करण्यात आली. नोबेल सायन्स टॅलेंट सर्च परीक्षेच्या मुलाखतीचा अंतिम निकाल काल उशिरापर्यंत प्राप्त झाला यात ५७ विद्यार्थ्यांना इस्रो च्या सहलीसाठी जाण्याची संधी मिळाली. या यशाबद्दल प्रणित भाटीया व त्याचे मार्गदर्शक सागर राजेंद्र गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची रुची निर्माण व्हावी तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च तंत्रज्ञान संस्था बघता याव्यात यासाठी, मागील वर्षी नोबेल फाउंडेशन आणि भरारी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय ‘नोबेल सायन्स टॅलेंट सर्च परीक्षा’ घेण्यात आली होती. या परीक्षेच्या मुलाखतीचा अंतिम निकाल काल संध्याकाळी जाहीर करण्यात आला. याअंतर्गत राज्यभरातील शहरी तसेच ग्रामीण भागातील ५७ विद्यार्थ्यांची विनामूल्य इस्रो सहलीसाठी निवड करण्यात आली आहे. राज्यभरातून ५२०० विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती, त्यापैकी ३१९ विद्यार्थ्यांची मुलाखतीसाठी निवड झालेली होती. यामधून ५७ विद्यार्थ्यांची अंतिम यादीत निवड झालेली आहे. या यादीत गुड शेपर्ड स्कुलमधील इयत्ता ८ वी चा विद्यार्थी प्रणित भाटीया २७ व्या क्रमांकावर आहे.
प्रणित भाटीया याने संपादन केलेल्या यशाबद्दल शाळेच्या प्राचार्या चैताली रावतोळे यांनी त्याचा सत्कार केला. शाळेचे शाखा व्यवस्थापक जगन गावित यांनी प्रणित चे मार्गदर्शक सागर गायकवाड सरांचा सत्कार केला. याप्रसंगी प्रणितच्या मागील वर्षाच्या वर्गशिक्षिका अनुराधा भावे, या वर्षी वर्गशिक्षिक असलेले लक्ष्मण पाटील व त्याच्या विज्ञान शिक्षिका सपना पाटील यांचा देखील सत्कार करण्यात आला. प्रणितला सागर राजेंद्र गायकवाड यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. सागर गायकवाड यांनी प्रणित च्या यशस्वी वाटचालीबद्दल व नोबेल सायन्स टॅलेंट सर्च परिक्षेबद्दल माहिती दिली. याप्रसंगी शाळेच्या प्राचार्या चैताली रावतोळे, शाखा व्यवस्थापक जगन गावित, जेष्ठ शिक्षक संतोष सुर्यवंशी, रिबेका फिलिप, अनुराधा भावे, गायत्री सोनवणे, ग्रीष्मा पाटील, पूनम कासार, दामिनी पगारिया, शिरीन खाटीक, नाजनिन शेख, सपना पाटील, लक्ष्मण पाटील, सागर गायकवाड, अमोल सोनार हे शिक्षकवृंद तसेच शितल सोनवणे, अमोल देशमुख, इंद्रसिंग पावरा हे शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह ५ वी ते १० वी चे विद्यार्थी – विद्यार्थिनी कोविड – १९ च्या नियमांचे पालन करून उपस्थित होते.