जळगाव (प्रतिनिधी) पत्नीच्या चारीत्र्यावर संशय घेवून पतीने चाकूने तिच्यावर वार करत मारहाण केल्याची घटना आज सकाळी गेंदालाल मिल परिसरात घडली. या प्रकरणी शहर पोलीस स्थानकात पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, आफ्रीनबी हारून खान, पती हारून मुस्तफा खान, सासू व तीन मुलांसह गेंदालाल मिल परिसरात राहतात. पती हारून हा मालवाहतूक चारचाकी वाहनावर चालक म्हणून काम करतात. आज शुक्रवारी सकाळी सासू ह्या ईदनिमित्त नातेवाईकांना भेटण्यास गेल्या होत्या तर मुले देखील बाहेर गेली होती. त्यामुळे पती-पत्नी दोघे घरी होते. सकाळी ८.३० वाजता पती हारून याने पत्नीकडे दाढी करण्यासाठी पैसे मागितले व नंतर दाढी करण्यासाठी घराबाहेर पडले. काही वेळानंतर ते दाढी न करता घरी परतले. व पत्नीच्या चारीत्र्यावर संशय घेवून तिला शिवीगाळ केली. त्यानंतर हारून याने भाजी कापण्याचा चाकू घेऊन पत्नीच्या मनगटावर, छाती तसेच पोटाच्या मध्यभागी चाकूने वार केला. नंतर तिला मारहाण केली. चाकूच्या हल्ल्यामुळे मनगटातून रक्त निघत असल्याचे पाहून आफ्रीन यांनी आरडाओरड केली असता, गल्लीतील रहिवाश्यांनी खान यांच्या घराकडे धाव घेतली व भांडण सोडविले.
याप्रकरणी आफ्रीन यांनी पोलिसात तक्रारी दिली व नंतर उपचारार्थ त्यांना जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी पती हारूण याच्याविरूध्द शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.