मुंबई (वृत्तसंस्था) संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या मीरा रोडमधल्या सरस्वती वैद्य हत्याकांड प्रकरणात एक धक्कादायक कबुली आरोपी मनोज साने याने पोलीस चौकशीत दिली आहे. सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे करण्याची कल्पना आपल्याला वसईच्या श्रद्धा वालकर प्रकरणावरुन सुचल्याचे त्याने पोलिसांना सांगितले आहे.
नेमकं काय आहे प्रकरण !
मीरारोडमध्ये गेल्या तीन वर्षांपासून वास्तव्य करणारे मनोज साने (५६) व सरस्वती वैद्य (३२) हे १० वर्षांपासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होते. बुधवारी त्यांच्या फ्लॅटमधून अतीदुर्गंधी येऊ लागल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवलं. पोलिसांनी घराचं कुलूप तोडून आत प्रवेश करताच धक्कादायक दश्य नजरेस पडलं. आधी पोलिसांना सरस्वतीचे पाय सापडले. नंतर घराच्या आतल्या भागात तिचं धड, शीर, हात अशा वेगवेगळ्या अवयवांचे तुकडे कापून बादली, पातेल्यात लपवून ठेवल्याचं दिसून आलं. मनोज सानेनं सरस्वतीच्या मृतदेहाचे अनेक तुकडे केले होते. काही तुकडे त्यानं कुकरमध्ये शिजवले, तर काही गॅसवर भाजले. काही तुकडे तर बारीक करण्यासाठी मिक्सरचा वापर केल्याचंही आढळून आले. एवढेच नव्हे तर पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपी सानेने तिच्या शरीराचे तुकडे शिजवून कुत्र्यांना खायला घातल्याची थरकाप उडवणारी माहिती देखील पोलिस चौकशीत समोर आली.
श्रद्धा वालकर प्रकरणावरुन सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे करण्याची सुचली कल्पना !
मनोज साने याने आपल्याला श्रद्धा वालकर प्रकरणावरुन सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे करण्याची कल्पना सुचल्याचे पोलीस चौकशीत सांगितले. वसईच्या श्रद्धा वालकर हिची तिचा लिव्ह इन पार्टनर आफताब पुनावाला याने अशाचप्रकारे हत्या केली होती. आफताबने श्रद्धाच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करुन त्यांची विल्हेवाट लावली होती. आफताबने श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे करुन ते फ्रीजमध्ये ठेवले होते. तसेच मृतदेहाची दुर्गंधी लपवण्यासाठी रुम फ्रेशनर्स, अत्तरांचा वापर केला होता. दरम्यान, मनोज सानेनं हे कृत्य नेमकं का केलं? दोघांमध्ये नेमका काय वाद झाला? यासंदर्भात पोलीस सविस्तर तपास करत आहेत.
मृतदेह लवकर कुजू नये म्हणून निलगिरी तेलचा वापर !
मनोज साने यानेदेखील सरस्वती वैद्य हिची हत्या केल्यानंतर निलगिरी तेलाच्या पाच बाटल्या खरेदी केल्या होत्या. मृतदेह लवकर कुजू नये,यासाठी मनोजने त्यावर निलगिरी तेल लावले होते. आफताब पुनावालाही श्रद्धाचे मुंडके आणि मृतदेहाचे इतर तुकडे अनेक दिवस घरात ठेऊन सहजपणे वावरत होता. त्याप्रमाणे मनोज साने यानेही किचन आणि बेडरुममध्ये सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे ठेवले होते आणि दुसऱ्या बेडरुममध्ये तो रोज झोपत होता.